गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:16 IST2026-04-07T13:16:22+5:302026-04-07T13:16:56+5:30

मोफत शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी; बिडकीन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सफाई कामगार अटकेत

Bribe demanded for free surgery for the poor; ACB's big 'trap' in Bidkin, doctor arrested | गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड

गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड

बिडकीन : शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी १ हजार २०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कंत्राटी सफाई कर्मचारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराच्या बहिणीची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात करायची होती. ही शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत होणे अपेक्षित असताना येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बजरंग दळवी यांनी ५ एप्रिल रोजी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शासकीय सेवा मोफत असताना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ६ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीची पडताळणी केली असता, डॉ. दळवी यांनी शस्त्रक्रिया करून देण्यासाठी तडजोडीअंती १ हजार २०० रुपये लाच मागितल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. ही रक्कम त्यांनी रुग्णालयातील सफाई कामगार नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी रुग्णालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून १ हजार २०० रुपये स्वीकारताच ब्राह्मणे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी डॉ. दळवी यांनाही पोलिसांनी झडप घालून अटक केली.

मोबाइल आणि रोख रक्कम जप्त
कारवाईदरम्यान डॉ. दळवी यांच्याकडून एक मोबाइल, तर सफाई कामगार ब्राह्मणे याच्याकडून लाचेची रक्कम आणि मोबाइल जप्त करण्यात आला. सध्या आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, तपास अधिकारी संतोष तिगोटे, हवालदार इंगळे आणि युवराज हिवाळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Web Title : मुफ्त सर्जरी के लिए रिश्वत लेते डॉक्टर गिरफ्तार।

Web Summary : बिडकिन में मुफ्त परिवार नियोजन सर्जरी के लिए ₹1200 की रिश्वत लेते एक डॉक्टर को गिरफ्तार किया गया। एसीबी के जाल में डॉक्टर और एक सफाई कर्मचारी शिकायत दर्ज होने के बाद रंगे हाथों पकड़े गए।

Web Title : Doctor arrested for bribery in free surgery scheme.

Web Summary : A doctor in Bidkin was arrested for accepting a bribe of ₹1200 for a free family planning surgery. An ACB trap caught the doctor and a sanitation worker red-handed after a complaint was filed.