इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 06:24 IST2025-12-04T06:23:35+5:302025-12-04T06:24:27+5:30
Indigo flights issue: शहरातून १२३ प्रवासी मुंबईला गेले. याच विमानात रद्द झालेल्या बुधवार सकाळच्या नियमित विमानातील प्रवाशांचीही सोय करण्यात आली.

इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोचे मुंबईचे सकाळचे आणि रात्रीचे विमान बुधवारी रद्द करण्यात आले. तर मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ताटकळविल्यानंतर रद्द केलेल्या विमानातील प्रवाशांची बुधवारी सकाळी प्रवासाची सोय करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला येणारे प्रवासी तब्बल १२ तासांनंतर शहरात दाखल झाले.
इंडिगोचे गेल्या काही दिवसांपासून वारंवार वेळापत्रक विस्कळीत होत आहे. मंगळवारी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मध्यरात्रीपर्यंत ताटकळविल्यानंतर हे विमानच रद्द करण्यात आले. सर्वाधिक हाल मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या प्रवाशांचे झाले. रात्र मुंबई विमानतळावरच काढावी लागली.
छत्रपती संभाजीनगरमधील प्रवाशांची हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. तर काहींना रस्ते मार्गाने मुंबईला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. याबाबत स्थानिक इंडिगोप्रमुख अनिरुद्ध पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
१३१ आले, १२३ प्रवासी गेले
मंगळवारी रात्री रद्द झालेल्या विमान प्रवाशांसाठी बुधवारी सकाळी विमानसेवा देण्यात आली. या विमानाने मुंबईहून १३१ प्रवासी आले, तर शहरातून १२३ प्रवासी मुंबईला गेले. याच विमानात रद्द झालेल्या बुधवार सकाळच्या नियमित विमानातील प्रवाशांचीही सोय करण्यात आली.
दिल्लीचे विमान बुधवारी एक तास उशिरा आले. त्यामुळे शहरातून दिल्लीला जाणाऱ्या विमानासही विलंब झाला.
लंडनहून मंगळवारी दुपारी मुंबई विमानतळावर आले. सायंकाळच्या विमानाने शहरात येणार होते. परंतु मंगळवारची रात्र मुंबई विमानतळावर काढावी लागली. इंडिगोकडून काहीही माहिती दिली जात नव्हती. सकाळी विमानाची व्यवस्था करण्यात आली. त्यातही रद्द झालेल्या नियमित प्रवाशांची सोय करण्यात आली. या विमानानेही एक तास उशिराने मुंबईहून उड्डाण घेतले. -वेदश्री बोरगावकर, प्रवासी