गोदावरीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांना धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:56 IST2026-02-16T14:56:17+5:302026-02-16T14:56:40+5:30
शुक्रवारपासून घरातून बेपत्ता तरुणाचा रविवारी सकाळी जुने कायगाव येथे आढळला मृतदेह

गोदावरीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांना धक्का!
कायगाव : मिटमिटा येथील तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय युवकाचा रविवारी जुने कायगाव शिवारातील गोदावरी पात्रात मृतदेह आढळला. सर्वेश संदीप अवसरमल (वय २०, रा. आर्च अंगण, मिटमिटा, छत्रपती संभाजीनगर) असे मृत युवकाचे नाव असून तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
सर्वेश अवसरमल हा शुक्रवारपासून (दि.१३) घरातून बेपत्ता होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, रविवारी सकाळी जुने कायगाव येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरातील नदीच्या पात्रात रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ गंगापूर पोलिस ठाणे येथे माहिती दिली. पोलिस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल जाधव, पंकज बिरुटे व अमोल बिरुटे यांच्यासह रुग्णवाहिका चालक अनिकेत मुळक व शुभम वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल धाबे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. दरम्यान, सर्वेशची दुचाकी छत्रपती संभाजीनगर-पुणे मार्गावरील जुने कायगाव येथील पुलावर आढळून आली. सर्वेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्याने आत्महत्या केली की, कोणी घातपात केला, याबाबत पोलिस तपास करत आहेत.