दुसऱ्या दिवशी घेतला मृतदेह ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:29+5:302021-02-05T04:12:29+5:30
औरंगाबाद : पिशोर ठाण्याचा पोलीस कर्मचारी निलंबित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री साडेआठ वाजता भगवान हरिदास महालकर (वय ३५) ...

दुसऱ्या दिवशी घेतला मृतदेह ताब्यात
औरंगाबाद : पिशोर ठाण्याचा पोलीस कर्मचारी निलंबित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री साडेआठ वाजता भगवान हरिदास महालकर (वय ३५) यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पिशोर पोलीस कोठडीत असलेले भगवान महालकर यांनी शुक्रवारी सकाळी स्वच्छतागृहात ॲसिड प्राशन केले. त्यांच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. तथापि, या प्रकरणी भगवान महालकर यांचे नातेवाईक व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पिशोर ठाण्याचे निरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि तक्रारदार मुलीच्या वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे भगवान यांचा मृतदेह कालपासून घाटी शवागृहात पडून होता.
रविवारी हे प्रकरण चौकशीसाठी ‘सीआयडी’कडे वर्ग करण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी एक पोलीस कर्मचारी निलंबित केल्यानंतर सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले व रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृताचा भाऊ गणेश हरिदास महालकर, चुलत भाऊ मिठ्ठू महालकर, अशोक महालकर, गणेश महालकर, वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद पश्चिम विभागाचे अध्यक्ष योगेश बन, कन्नड तालुकाध्यक्ष मुख्तार सय्यद व कार्यकर्ते उपस्थित होते.