पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:32 IST2025-05-16T18:31:10+5:302025-05-16T18:32:15+5:30
काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.

पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का?
छत्रपती संभाजीनगर : फळे ही शरीरासाठी आरोग्यदायी असतात; परंतु काही फळे रिकाम्यापोटी खाल्ल्यास काहींना पोटफुगी, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे अशी फळे रिकाम्यापोटी खाणे टाळली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
काही फळे उष्ण; काही आम्लधर्मी
केळी, पपई यासारखी फळे उष्ण असतात. संत्री, मोसंबी, अननस ही आम्लधर्मी फळे आहेत. ही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने काहींना त्रास होऊ शकतो. पपई शरीरातील उष्णता वाढवते. उन्हाळ्यात रिकाम्यापोटी पपई खाल्ल्यास घशाला कोरड पडणे, शरीरात उष्णता वाढणे, पोटात जळजळ होणे, अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात.
रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास....
रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास काही जणांमध्ये ॲसिडिटीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे अपचन, छातीत जळजळ किंवा पित्त वाढल्यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे अनेकांना रिकाम्यापोटी आंबट फळे खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
फळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबर
फळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबर असते. फळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते.
उन्हाळ्यात कोणती फळे खाल?
उन्हाळ्यात मोसमी आणि थंड प्रकृतीची फळे खाणे फायदेशीर असते. कलिंगड, खरबूज, सफरचंद, आंबा (मर्यादित प्रमाणात), डाळिंब आदी फळे खाल्ली पाहिजे.
नाश्त्याला फळे खाणे योग्य की अयोग्य?
नाश्त्यामध्ये फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरते. त्याबरोबर जेवणातही फळांचा समावेश असणे, हे अधिक उपयुक्त ठरते.
फळांमध्ये अँटिऑक्सिडंट
फळांमध्ये अँटिऑक्सिडंट असते. शरीराच्या शुद्धीकरणात ते फायदेशीर ठरते. उपाशीपोटी फळे खाल्ली तरी चालतात. प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते. उपाशीपोटी फळ खाल्ले तर त्रास होतो, असे नाही. मात्र, एखादे फळ खाल्ल्यानंतर वारंवार त्रास होत असेल तर तो फळामुळे होत असेल.
- मंजू मंठाळकर, आहारतज्ज्ञ, घाटी रुग्णालय