भोंदूबाबांकडून ब्लॅकमेलिंग, मृत्यूची भीती दाखवून पैसे उकळले; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:12 IST2026-02-13T18:11:53+5:302026-02-13T18:12:08+5:30
बाहेर एक जण कुटुुंबाची माहिती घ्यायचा, मायक्रोफोनद्वारे ऐकून दुसरा घरात तीच माहिती पुरवून उकळायचा पैसे

भोंदूबाबांकडून ब्लॅकमेलिंग, मृत्यूची भीती दाखवून पैसे उकळले; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
छत्रपती संभाजीनगर : नंदीबैल घेऊन फिरत भविष्य सांगण्याच्या बहाण्याने सहा भोंदूबाबांच्या टोळीने नागरिकांना मृत्यूची भीती दाखवून ब्लॅकमेल केले. हा बोगस प्रकार एका सुज्ञ नागरिकाच्या लक्षात येताच त्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यात सहाही जण पळून गेले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
ओंकार प्रकाश शिराढोणकर हे एन-६ येथील साईनगरात कुटुुंबासह राहतात. गुरुवारी सकाळी ११ वाजता साईनगरमध्ये नंदीबैल घेऊन सहा जण फिरत होते. ओंकार यांचे ७८ वर्षीय वडील नंदीबैलासाठी तांदूळ घेऊन गेले. मात्र, बैलासोबतच्या व्यक्तीने पोळीभाजीची मागणी केली. त्यांचे संभाषण सुरूच असतानाच भोंदूंच्या टोळीपैकी एक जण थेट त्यांच्या घरात घुसला. त्याने ओंकार यांच्या मुलाला साथीदारांना पाणी देण्यास सांगून बाहेर पाठवून तो घरातच थांबला. त्याने अचानक शिराढोणकर कुटुंबाची माहिती देण्यास सुरुवात केली. पार्श्वभूमी, नातेवाईक, निधन झालेल्या व्यक्ती, आर्थिक उत्पन्न, पैठणचा कारखाना, सदस्यांची इत्यंभूत माहिती दिली.
तुमचा दहा दिवसांत मृत्यू होणार
कौटुंबिक माहिती देताना भोंदूबाबाने अचानक ओंकार यांच्या पत्नीला तुमचा १० दिवसांत अर्धांगवायूने मृत्यू होणार असल्याचे सांगितले. यामुळे कुटुंबाला धक्का बसला. हे संकट टाळण्यासाठी ५० हजारांची मागणी केली. ओंकार यांनी नकार दिला. मात्र, पत्नीने साडेतीन हजार भोंदूबाबाच्या हाती टेकवले, तेव्हा त्याने मंत्र पुटपुटण्याचे नाटक केले.
नेमका काय होता प्रकार?
सहा जणांच्या टोळीतील प्रत्येकाच्या कानात मायक्रोफोन होता. त्यांचा एक साथीदार घरात जातो. बाहेर उभे साथीदार त्याच वेळी कुटुुंबातील बाहेर आलेला सदस्य, शेजाऱ्यांशी बोलून माहिती मिळवून काॅलद्वारे त्याला ऐकवायचे. भविष्याची भीती घालून पैसे उकळायचे. पैसे देण्यास नकार दिल्यावर शिवीगाळ केल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
थेट ठाण्यात नेले
परिसरात अनेकांसोबत हा प्रकार घडल्याचे कळताच ओंकार यांनी त्यातील एकाला पुन्हा कॉल केला. कारखान्याबाबत विचारायचे सांगून परत बोलावले. टोळीतील एक भामटा तत्काळ परतला. त्याला कारमध्ये बसवून थेट सिडको पोलिस ठाण्यात नेले. ठाण्याबाहेरूनच तो पळाला. हे कळताच त्याचे पाच साथीदारही बैलासह पळून गेले. ओंकार यांची लेखी तक्रार सिडको पोलिसांनी घेतली. मात्र, सायंकाळी एका राजकीय पदाधिकाऱ्याने तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचेही ओंकार यांनी सांगितले.