छ. संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! गलांडे अध्यक्ष, तर जैस्वाल उपाध्यक्षपदी बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:43 IST2026-03-18T14:41:14+5:302026-03-18T14:43:02+5:30

महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदही भाजपच्या ताब्यात!

BJP Wins Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad; Avinash Galande Elected President Unopposed | छ. संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! गलांडे अध्यक्ष, तर जैस्वाल उपाध्यक्षपदी बिनविरोध

छ. संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! गलांडे अध्यक्ष, तर जैस्वाल उपाध्यक्षपदी बिनविरोध

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या राजकारणात बुधवारी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. २०१७ च्या पराभवाचा वचपा काढत तब्बल ९ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. अध्यक्षपदासाठी वैजापूरचे अविनाश गलांडे आणि उपाध्यक्षपदासाठी फुलंब्रीचे जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मध्यरात्रीतून खेळलेल्या चालीमुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले.

महापालिकेनंतर जिल्हा परिषद काबीज करण्याचा चंग भाजपने बांधला होता. शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ३७ सदस्यांचा दावा केला होता. मात्र, मंत्री अतुल सावे यांनी हे आव्हान स्वीकारत रात्रीतून चक्रे फिरवली आणि विरोधकांची गोळाबेरीज वजाबाकीत बदलली. परिणामी, निर्णायक आकडा नसल्याचे स्पष्ट होताच शिंदेसेनेने बहिष्काराचा, तर ठाकरेसेनेने तटस्थ राहण्याचा मार्ग निवडला.

भाजपचा 'विजयी' आकडा
६३ सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे स्वतःचे २३, अपक्ष २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४, प्रहार १, काँग्रेस १ असे एकूण ३१ सदस्य होते. सत्ता स्थापनेसाठी आकडा भाजपने सहज ओलांडला. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. या विजयामुळे जिल्ह्यात भाजपची पकड अधिक घट्ट झाली असून, महायुतीमधील 'मोठा भाऊ' कोण? हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Web Title : छत्रपति संभाजीनगर जिला परिषद चुनाव में बीजेपी की जीत!

Web Summary : बीजेपी ने छत्रपति संभाजीनगर जिला परिषद पर नौ साल बाद कब्जा किया, अविनाश गलांडे और जितेंद्र जैस्वाल निर्विरोध चुने गए। मंत्री अतुल सावे की रणनीति से विपक्ष परास्त हुआ, जिससे बीजेपी को छोटे दलों के समर्थन से बहुमत मिला। इससे जिले में बीजेपी का दबदबा मजबूत हुआ।

Web Title : BJP claims victory in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad election.

Web Summary : BJP secured control of Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad after nine years, electing Avinash Galande and Jitendra Jaiswal unopposed. Minister Atul Save's strategy outmaneuvered opponents, leading to a BJP majority with support from smaller parties. This solidifies BJP's dominance in the district.