भाजप-शिंदेसेनेचे एकमेकांविरोधात उमेदवार, युती म्हणजे केवळ 'थोतांड'; अंबादास दानवेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:54 IST2026-02-04T13:53:10+5:302026-02-04T13:54:26+5:30
"जादुई आकडा नाही, मग महापौर कसा होणार?" अंबादास दानवे यांनी एमआयएमला विचारला जाब

भाजप-शिंदेसेनेचे एकमेकांविरोधात उमेदवार, युती म्हणजे केवळ 'थोतांड'; अंबादास दानवेंची टीका
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी एमआयएम आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. "ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, ते महापौरपदाचे स्वप्न कसे पाहू शकतात?" असा सवाल करत त्यांनी एमआयएमच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे.
युती म्हणजे केवळ 'थोतांड'
शहर आणि जिल्ह्यात भाजप-शिंदेसेना युती केवळ कागदावरच उरल्याचा दावा दानवे यांनी केला. "वरच्या नेत्यांनी युती केली असली, तरी खालच्या स्तरावर एकमेकांविरोधात 'एबी फॉर्म' देण्यात आले आहेत. ही युती म्हणजे निव्वळ थोतांड आहे," असे ते म्हणाले. महापौर कोणाचा होणार याच्याशी शिवसेनेचा संबंध नसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने लोकशाहीचा कौल मानलाच पाहिजे.
नाशिक पोलीस आयुक्त आणि राणे कुटुंबीयांवर निशाणा
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विधानाचा दाखला देत दानवे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन 'आऊट ऑफ द वे' जाऊन मदत करत आहे. दुसरीकडे, नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी उद्धव ठाकरेंना फोन केला होता आणि ठाकरेंनी ती परवानगी दिली होती. नितेश राणेंनी बालिशपणा थांबवावा," असा टोला त्यांनी लगावला.
मराठी महापौरासाठी मतं कुठे गेली?
मीरा-भाईंदरमधील 'मराठी महापौर' या मागणीवरून त्यांनी मतदारांनाही खडे बोल सुनावले. "मतदान करताना मराठी उमेदवारांना डावलायचं आणि नंतर मराठी महापौर करा म्हणून मोर्चे काढायचे, याला काही अर्थ नाही. लोकांनी निवडून दिले असते तर आज ही वेळ आली नसती," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.