भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता, हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:14 IST2025-02-22T13:12:36+5:302025-02-22T13:14:04+5:30
शहर व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने होणार बदल

भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता, हालचालींना वेग
छत्रपती संभाजीनगर : शहर व जिल्ह्यातील भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष या पदावर आ. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर, राज्यातील सर्व जिल्ह्यातील शहर व जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना होईल. आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने विद्यमान पदाधिकाऱ्यांची पूर्ण टीम तशीच ठेवायची की त्यात बदल करायचा, हे नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती झाल्यावर स्पष्ट होईल.
नोव्हेंबर २०२२ मध्ये शिरीष बोराळकर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा उमेदवार निवडून आणण्यामागे भाजपचे नियोजन महत्त्वाचे ठरले. विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांत महायुतीला यश मिळाले. त्यात शिंदेसेनेचे दोन उमेदवार विजयी होण्यामागे भाजपचे संघटन मोठे होते. दरम्यान, सरचिटणीस जालिंदर शेंडगे, दीपक ढाकणे व इतरांनी गेल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोराळकर यांच्या काळात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यामुळे त्यांना विधान परिषद सदस्यपदी घेण्यात यावे, अशी मागणी केली. त्यामुळे मार्चनंतर होणाऱ्या संघटन फेरबदलात बोराळकर यांना ‘प्रमोशन’ मिळणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत तेच कायम राहणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
ग्रामीणमध्येही होणार पुनर्रचना
शहरासह ग्रामीणमध्ये कार्यकारिणी बदलेल. ग्रामीणमध्ये सुहास शिरसाट व संजय खंबायते हे दोन जिल्हाप्रमुख आहेत. या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या काळातही लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. जिल्हाप्रमुख शिरसाट यांच्या मतदारसंघात भाजपला यश मिळाले नाही तर खंबायते यांच्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यातर विद्यमान कार्यकारिणीच कायम राहील, असे बोलले जात आहे. दरम्यान, खा. डॉ. भागवत कराड यांना कार्यकारिणी केव्हा बदलणार, यावर पत्रकारांनी प्रश्न केला असता ते म्हणाले, पक्ष पातळीवर याचा निर्णय होईल, सध्या काही सांगता येणार नाही.