सत्तारांच्या सिल्लोडमध्ये भाजप पुन्हा सक्रीय; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, खासदार दानवेंची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 17:30 IST2023-07-04T17:29:33+5:302023-07-04T17:30:57+5:30
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात सरकारची आणि संघटनेची ताकद उभी करण्याची ग्वाही

सत्तारांच्या सिल्लोडमध्ये भाजप पुन्हा सक्रीय; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, खासदार दानवेंची बैठक
सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात भाजप पुन्हा नव्या जोमाने बळकट करून विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर यांच्या मागे सरकारची व संघटनेची ताकद उभी करू, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे रविवारी रात्री झालेल्या बैठकीत केले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जामनेरला नियोजित दौरा होता. जाता जाता त्यांचा सिल्लोड येथे सत्कार करण्याचा बेत भाजप पदाधिकाऱ्यांनी आखला आणि त्याचे पर्यवसान आढावा बैठकीत झाले. रात्री १०:३० वाजता बावनकुळे येथे दाखल झाले. त्यांनी रात्री १२ वाजेपर्यंत बैठक घेतली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रदेश सचिव किरण पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अजित गोपछडे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश उपाध्यक्ष एजाज देशमुख, माजी आमदार सांडू पा. लोखंडे, सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर, चेअरमन इद्रिस मुलतानी, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, अशोक गरुड, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, प्रदेश सदस्य अशोक तायडे, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, ज्ञानेश्वर तायडे, गणेश बनकर आदी उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांसहित विरोधकांच्या भुवया उंचावल्या
यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात सरकारची आणि संघटनेची ताकद आम्ही भाजप प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांच्या मागे उभी करू, आपणही त्यांच्या नेतृत्वात काम करा, असे विधान केल्याने आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या व भाजपच्या तिकिटावर किंवा अपक्ष लढण्याची तयारी करणाऱ्या इतर पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकंदरीत आगामी जालना लोकसभा व सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व सुरेश बनकर यांच्याच नेतृत्वात होतील, हे यावरून निश्चित झाले आहे.