महिंद्र रमेश अहिल्ये (२०) आणि ओमकार विष्णू चव्हाण (२३, दोघे रा.हनुमाननगर, गारखेडा) अशी आरोपींची नावे आहेत. जवाहरनगर पोलीस ठाण्यामागील हनुमाननगर येथील एका गल्लीत राहणाऱ्या महिंद्रचा १ एप्रिल रोजी २०वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींनी आणलेला केक रस्त्यावर कापून साजरा करण्यात आला. यानंतर, आरोपी चव्हाण हा त्याला घरी घेऊन गेला. त्यांनी घरात तलवारीने केक कापला. चव्हाण तलवारीला लागलेला केक महिंद्रला भरवित असल्याचे छायाचित्र व्हॉट्सॲप या सोशल मीडियावरील अनेक ग्रुपवर व्हायरल झाले. ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी झटपट कारवाई करीत सोमवारी सायंकाळी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात सरकारतर्फे गुन्हा नोंदविला. आरोपी महिंद्रच्या घरातून धारदार तलवार जप्त केली. तलवारीने केक कापणाऱ्या महिंद्रचे वडील चहाचे हॉटेल चालवितात. तो त्यांना व्यवसायात मदत करतो, तर चव्हाण कोणताही कामधंदा करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
========छायाचित्र आहे=====