जालना रोडवर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालकाचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:52 IST2025-07-28T11:51:47+5:302025-07-28T11:52:52+5:30
या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. जवळपास पाऊण तासापेक्षा जास्त वाहतूक कोंडी झाली होती.

जालना रोडवर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालकाचे पलायन
छत्रपती संभाजीनगर : भरधाव वेगातील अज्ञात चारचाकी गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. हा अपघात रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ घडला. त्यामुळे काहीवेळ वाहतूक काेंडी झाली होती. पुंडलिकनगर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
सिडकोकडून सेव्हन हिलकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला (एमएच २० एफवाय ३९६३) त्याच्या पाठीमागून येणाऱ्या कारचालकाने जोराची धडक दिली. हा अपघात उड्डाणपुलाच्या अलीकडेच घडला. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याच्या दुचाकीचा चुराडा झाला. कारचालक पसार झाला. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. जवळपास पाऊण तासापेक्षा जास्त वाहतूक कोंडी झाली होती. सेव्हन हिलपासून हायकोर्ट सिग्नलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी उपनिरीक्षक सुनील मस्के यांच्यासह पोलिसांना घटनास्थळी रवाना केले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तोपर्यंत स्थानिकांनी मृताला घाटीत हलविले. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.