उद्योजक परदेशात, दरोडेखोरांचा घरात धुमाकूळ; ५.५ किलो सोने, ३२ किलो चांदीची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:58 IST2025-05-16T14:56:46+5:302025-05-16T14:58:20+5:30
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर उच्चभ्रू वसाहतीत हा धाडसी दरोडा पडला.

उद्योजक परदेशात, दरोडेखोरांचा घरात धुमाकूळ; ५.५ किलो सोने, ३२ किलो चांदीची लूट
छत्रपती संभाजीनगर/वाळूज : बजाजनगरच्या आर. एल. सेक्टरमध्ये राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर सहा शस्त्रधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. घरात झोपलेल्या लड्डा यांच्या चालकाचे चिकटपट्टीने तोंड, रुमालाने हात बांधून छातीवर पिस्तूल रोखत त्यांनी तब्बल ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने, ७० हजार रोख रक्कम लुटून नेली. गुरुवारी मध्यरात्री २ ते ४ दरम्यान असे दोन तास दरोडेखोर घरात धुमाकूळ घालत होते. विशेष म्हणजे, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर उच्चभ्रू वसाहतीत हा धाडसी दरोडा पडला.
लड्डा यांची वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये ‘दिशा ऑटो कॉम्प्स’ कंपनी आहे. ७ मे रोजी ते पत्नी, मोठ्या मुलासह अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी गेले होते. त्यांचे १९ वर्षांपासून चालक असलेले संजय झळके यांना घराची देखभाल करण्यासाठी सांगितले होते. गुरुवारी रात्री १० वाजता झळके जेवून झोपी गेले. मध्यरात्री २ वाजता कारमधून आलेले दरोडेखोर सुरक्षाभिंतीवरून उड्या मारत बंगल्यात घुसले. तेथीलच शिडीने पहिल्या मजल्यावर जात दरवाजा तोडून घरात घुसले. घरात घुसताच तळमजल्यावर झोपलेल्या झळके यांना मारहाण करून हात व तोंड बांधले. त्यांच्या छातीवर गावठी पिस्तूल रोखून दोन दरोडेखोर झळके यांच्याजवळ थांबले, तर अन्य चौघांनी बेडरूमचे दरवाजे तोडून लूट केली.
ग्रेनाईटच्या चौकटीच तोडल्या
- हॉल वगळता लड्डा यांनी अन्य सर्व खोल्यांना लॅच लॉक लावले होते. दरोडेखोरांनी त्या सर्व खोल्यांचे लॅच लॉक तुटत नसल्याने ग्रेनाईटची चौकट तोडून दरवाजे उखडले.
- खोल्यातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकले. कपाट, लॉकरमधील ५ किलो ५०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यात बांगड्या, कडे, पाटल्या, ब्रेसलेट, कानातील झुंबर, फुले, कंबरपट्टा, मंगळसूत्र, सोनसाखळी, पोतमंगळसूत्र, अंगठ्या, हिरेजडित दागिने, बिस्कीट, नाणे तर ३२ किलो चांदी, ज्यात पातिले, ताट, वाटी, पेले, चमचे, देवाच्या मूर्ती, नाणे, बिस्कीट, पैंजण आणि ७० हजार रोख लुटून नेली.
- सुरुवातीला ८ किलो सोने व ४० किलो चांदीचे दागिने नेल्याचा संशय होता. मात्र, २ किलो ४०० ग्रॅम सोने, ८ किलो चांदीचे दागिने घरातच मिळून आले. शहरात पहिल्यांदाच दरोड्यात इतके सोने लुटले गेले.
१.५८ ला प्रवेश, ४.०७ वाजता पसार
दरोडेखोर पांढऱ्या रंगाच्या कारने १.५८ वाजता लड्डा यांच्या घराजवळ पोहोचले. शेजारील घरासमोर कार उभी करून ४ वाजून ७ मिनिटांनी पिशव्यांत दागिने भरून घराबाहेर पडले. दरोडेखोर पसार झाल्यानंतर झळके यांनी घराबाहेर येत शेजाऱ्यांना मदत मागितली. घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त संजय सानप यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लड्डा यांचे मेहुणे ॲड. जगदीश तोष्णीवाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
आश्चर्य : देहबोली शांत, एकही ठसा नाही
कारमधून उतरताना तोंड झाकलेले दरोडेखोर एकमेकांशी हिंदीत संवाद साधत होते. त्यातील दोघांना गुड्डू, सलमान नावाने हाक मारल्याचे चालकाने सांगितले. विशेष म्हणजे, लुटमार करून जातानाही दरोडेखोरांची देहबोली शांत दिसून आली. घरात एकही अपेक्षित ठसा आढळला नसल्याने पोलिसही चक्रावून गेले.
लुधियाना ढाब्यापर्यंतच कार निष्पन्न
या गंभीर घटनेमुळे जवळपास पाच पोलिस ठाणे, गुन्हे शाखेचे पथक तपासकामी लागले. सायंकाळपर्यंत १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. दरोडेखोरांची कार लुधियाना ढाब्यापर्यंत जाताना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यापुढे वाळूज टोलनाक्यावर मात्र ती दिसली नाही. त्यामुळे ते अंतर्गत रस्त्याने गेले किंवा तेथूनच उलट फिरल्याचा संशय आहे.
मोबाइल फेकून दिला
दरोड्यानंतर जाताना दरोडेखोरांनी झळके यांचा मोबाइलही सोबत नेला. मात्र, तो कामगार चौकाच्या आसपास फेकून दिला. लड्डा यांच्या बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. आसपासच्या दोन घरांच्या कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले. लड्डा विदेशात असल्याने त्यांनी इतके सोने घरात का ठेवले, हे पोलिसांना कळू शकले नाही.
नियोजनबद्ध कट, रेकी करून दरोडा टाकल्याचा संशय
दरोडेखाेरांनी रेकी करून दरोडा टाकला. शिडी असल्याची त्यांना कल्पना असावी. घरात प्रवेश कोठून करायचा, कार कुठे उभी करायची, ग्रेनाईट चौकटी तोडण्यासाठी आवश्यक शस्त्र बाळगून ते होते. त्यामुळे नियोजनबद्ध कट, पुरेसा अभ्यास करून हा दरोडा टाकल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. दरम्यान, लड्डा यांच्याकडे काम करणाऱ्या चार ते पाच जणांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.