मोठी बातमी! ई-वाहने लवकरच समृद्धी महामार्गासह एक्सप्रेस-वेवर ‘टोल फ्री’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:45 IST2025-08-18T18:44:12+5:302025-08-18T18:45:52+5:30

परिवहन विभागाकडून चाचपणी अंतिम टप्प्यात

Big news! E-vehicles will soon be 'toll free' on expressways including Samruddhi Highway | मोठी बातमी! ई-वाहने लवकरच समृद्धी महामार्गासह एक्सप्रेस-वेवर ‘टोल फ्री’

मोठी बातमी! ई-वाहने लवकरच समृद्धी महामार्गासह एक्सप्रेस-वेवर ‘टोल फ्री’

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमार्गे जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून लवकरच ई-वाहनांना टोल न देता प्रवास करता येणार आहे. ई-वाहने टोल फ्री होण्यासाठी परिवहन विभागाची चाचपणी अंतिम टप्प्यात आली आहे. समृद्धी महामार्गाबरोबर मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि अटल सेतूवरही ई-वाहनांचा प्रवास टोलमुक्त होणार आहे.

तब्बल ७०१ किलोमीटर लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरत आहे. छत्रपती संभाजीनगरहून जाणारा हा महामार्ग मुंबईला नागपूरशी जोडतो आणि प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. आजघडीला या महामार्गावर हलक्या मोटार वाहनांना २.४५ रुपये प्रतिकिमी टोल लागतो. गेल्या काही वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचा कल ई-वाहनांकडे वाढत आहे. सरकारकडूनही या वाहनांचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ई-वाहनांचा प्रवास महामार्गांवरून टोलमुक्त करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. यात समृद्धी महामार्गाबरोबर मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि अटल सेतू यांचा समावेश असणार आहे.

टोल नाक्यावर ई-वाहन नेऊन तपासणी
महामार्ग तयार करणारी यंत्रणा, टोल कापणारी यंत्रणा, वाहनांची नोंद ठेवणारी यंत्रणा, परिवहन विभाग हे एकमेकांशी समन्वय साधून ई-वाहने टोल फ्री होण्यासाठी एकत्रित काम करत आहेत. ई-वाहनांना टोल लागणार नाही, यादृष्टीने परिवहन विभागाकडून चाचपणी केली जात आहे. यासाठी या तिन्ही मार्गांवर ई-वाहन नेऊन टोल कापला जातो की नाही, याची तपासणी केली जात आहे, अशी माहिती परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरातील ई-वाहने
- ई-चारचाकी : ९७६
- ई-बस : ४८

Web Title: Big news! E-vehicles will soon be 'toll free' on expressways including Samruddhi Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.