सोयीचे आरक्षण टाकण्यासाठी प्रगणक गटात मोठी गडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 08:16 PM2020-02-08T20:16:05+5:302020-02-08T20:17:58+5:30

वॉर्ड खुला करण्यासाठी केला प्रपंच, सर्व नियम पायदळी

Big mischief with the Promotional Group for putting up a reservation of convenience in Aurangabad municipality | सोयीचे आरक्षण टाकण्यासाठी प्रगणक गटात मोठी गडबड

सोयीचे आरक्षण टाकण्यासाठी प्रगणक गटात मोठी गडबड

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संशय 

औरंगाबाद : महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एका मोठ्या रॅकेटने वॉर्ड रचना तयार करताना मोठ्या प्रमाणात प्रगणक गटात उलटफेर केल्याचे धडधडीत पुरावेच आता समोर आले आहेत. सोयीचे आरक्षण टाकण्यासाठी, वॉर्ड खुला करण्यासाठी प्रगणक एका ठिकाणाहून उचलून दुसरीकडे नेण्यात आले आहेत. हा सर्व प्रपंच करताना वॉर्डाच्या चतु:सीमा बदलण्यात न आल्याने अधिकाऱ्यांची चोरी उघड झाली आहे.

एप्रिल-२०२० मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर शहरात मनपाने तयार केलेल्या वॉर्ड रचनेवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. दररोज वेगवेगळे घोटाळे यातील समोर येत आहेत. ५ जानेवारी २००५ च्या अध्यादेशानुसार वॉर्ड रचना करण्यात आल्याचा दावा मनपाकडून होत आहे. या अध्यादेशातील अनेक निर्देश पायदळी तुडविण्यात आले आहेत. शहरातील मोजक्याच २० राजकीय मंडळींना डोळ्यासमोर ठेवून हा ‘सब कुछ मॅनेज’ कार्यक्रम आखण्यात आला आहे. मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून आराखड्यात कसे घोटाळे केले याचे पुरावेच आता समोर येत आहेत. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच घसरली आहे. ज्या प्रगणक गटांच्या आधारे नवीन वॉर्ड, वॉर्ड रचना तयार करण्यात आली आहे, त्या गटांची माहितीच उघड करण्यात येत नव्हती. अखेर ११५ वॉर्डांचे प्रगणक गट बाहेर येताच घोटाळेही समोर येत आहेत.

क्रांतीचौक वॉर्ड आरक्षित कसा झाला?
२००५ (वॉर्ड क्रमांक-६४) मध्ये क्रांतीचौक वॉर्ड खुला होता. २०१० (वॉर्ड क्रमांक-६४) हा वॉर्ड खुलाच होता. २०१५ (वॉर्ड क्रमांक-७२) मध्ये नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी राखीव झाला. २०२० मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मागील तीन निवडणुकांमध्ये वॉर्डांच्या चतु:सीमेमध्ये किंचितही बदल झाला नाही. उलट २०१५ मध्ये या वॉर्डात अनुसूचित जातीच्या नागरिकांची संख्या फक्त ४३२ होती. २०२० मध्ये ती अचानक १६४८ झाली. पूर्वी या वॉर्डाची एकूण लोकसंख्या ९ हजार ४१७ होती. आता ११ हजार ६५ केली. हा वॉर्ड एका माजी खासदाराच्या मुलासाठी अनुसूचित जातीमध्ये टाकायचा होता. त्यासाठी ‘खास’ रमानगर येथील प्रगणक गट क्रमांक ०१९००० (लोकसंख्या-६९८), दुसरा प्रगणक ०१९१०० (लोकसंख्या-५४०) क्रांतीचौक वॉर्डात टाकण्यात आले. अनुसूचित जातीचे दोन प्रगणक गट येथे आणून वॉर्ड थेट आरक्षित करण्यात आला. मुळात वॉर्डाची लोकसंख्या दहा हजारांपर्यंत पोहोचलेली असताना त्यात १२३८ लोकसंख्या कशासाठी वाढविण्यात आली? वॉर्ड दहा हजारांपर्यंत नेण्यासाठी हे केले, असे उत्तर मनपा देणार आहे. मग मनपाने ज्योतीनगर (९,६०८), एकनाथनगर (९,७१४), कबीरनगर (९,४०५), वेदांतनगर (९,३९२), बन्सीलालनगर (९,८११) या वॉर्डांची लोकसंख्या का वाढविली नाही.

मयूरनगर-सुदर्शननगरला चक्रानुक्रम का नाही?
२०२० च्या मनपा निवडणुकीत मयूरनगर-सुदर्शननगर हा वॉर्ड क्रमांक २६ खुल्या प्रवर्गात नेण्यात आला आहे. या वॉर्डांच्या भौगोलिक चतु:सीमा आजही जशास तशा आहेत. २०१० (वॉर्ड क्रमांक-१६) मध्ये हा वॉर्ड नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखीव होता.
 २०१५ (वॉर्ड क्रमांक-०९) मध्ये खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी होता. २०२० मध्ये पुन्हा हा वॉर्ड खुल्या प्रवर्गात कसा काय जाऊ शकतो? येथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा चक्रानुक्रम कुठे गेला. वॉर्डात ७४१ लोकसंख्या अनुसूचित जातीसाठीची आहे. या वॉर्डातील एकही प्रगणक गटात वाढ किंवा उचलून दुसरीकडे टाकण्यात आलेले नाहीत. मनपा अधिकाऱ्यांनी कोणासाठी हा वॉर्ड ‘खास’व्यक्तींसाठी खुला केला हे सर्वश्रुत आहे.

पुंडलिकनगरला एस.सी. प्रवर्गातून बाहेर काढले
२००५-१५ पर्यंतच्या तीन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वॉर्डांचे आरक्षण टाकल्याचा दावा मनपा अधिकारी करीत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषाचे तंतोतंत पालन झाले असेल तर पुंडलिकनगर हा वॉर्ड यंदा खुल्या वर्गासाठी कसा काय निघाला? या वॉर्डाला एस.सी. प्रवर्गातून कोणी बाहेर आणले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुंडलिकनगर हा वॉर्ड २००५ (वॉर्ड क्रमांक -८३) मध्ये खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होता. २०१० (वॉर्ड क्रमांक-८३) मध्ये नागरिकांचा मागासवर्ग, २०१५ (वॉर्ड क्रमांक-९३) मध्ये वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होता. आता हा वॉर्ड चक्रानुक्रमे एस.सी. प्रवर्गासाठी थेट राखीव होत होता. मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रॅकेटने जादू करून थेट खुल्या पुरुषांसाठी केला. विशेष बाब म्हणजे वॉर्डाची लोकसंख्या ११ हजार २४४ आहे. त्यात अनुसूचित जातीची संख्या १००८ आहे. एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या २१५ आहे. अनुसूचित जातीला मागील २० वर्षांत वॉर्डातून निवडणूक लढविण्याची संधीच मनपाचे अधिकारी देणार नाहीत का?


आयोगाच्या परिशिष्टात खोटी माहिती भरली
निवडणूक आयोगाने चक्रानुक्रमे आरक्षण सोडतीसाठी गेल्या निवडणुकीतील माहिती परिशिष्ट ११ मध्ये वॉर्डनिहाय मागितली होती. मात्र या परिशिष्टामध्ये २०२० च्या प्रगणकांची माहिती भरण्यात आली आहे.४ त्यावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी २०१५ ची माहिती का भरली नाही? अशी विचारणादेखील केलेली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही प्रगणक गटांच्या प्रवर्गाची नावेच बदलण्यात आली आहेत.४ मागील निवडणुकीत वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होता, याची अनेक ठिकाणी माहिती अक्षरश: खोटी भरण्यात आल्याचेही समोर आले आहे. 

वॉर्ड रचनेवर ९७ आक्षेप दाखल
महापालिकेच्या प्रारूप वॉर्ड रचना व आरक्षण सोडतीवर आक्षेपांचा पाऊस सुरूच असून, शुक्रवारी हा आकडा ९७ पर्यंत पोहोचला. आज ३३ आक्षेप दाखल झाल्याचे मनपा निवडणूक विभागातर्फे सांगण्यात आले. आक्षेप व हरकती सादर करण्यासाठी ११ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. पहिल्या दिवशी ६, दुसऱ्या दिवशी २९, गुरुवारी ३५, तर शुक्रवारी ३३ आक्षेप दाखल झाले.

चक्रानुक्रमे या वॉर्डांची प्रक्रिया योग्य 

वर्ष    कोतवालपुरा    समर्थनगर    कोटला कॉलनी
२००५     एस.टी. प्रवर्ग    खुला प्रवर्ग महिला    खुला
२०१०    एस.सी. प्रवर्ग    खुला    अनुसूचित जाती
२०१५    ओबीसी महिला    अनुसूचित जाती    ओबीसी महिला
२०२०    खुला    ओबीसी महिला    खुला

Web Title: Big mischief with the Promotional Group for putting up a reservation of convenience in Aurangabad municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.