विश्वासघात! गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत दिरानेच चोरले वहिनीचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:01 IST2025-06-25T18:59:44+5:302025-06-25T19:01:03+5:30

सराफाला शंका आली अन्...गुन्हे शाखेने आरोपीचा लावला छडा

Betrayal! Taking advantage of the crowd at the housewarming event, brother-in-law stole sister-in-law's jewelry | विश्वासघात! गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत दिरानेच चोरले वहिनीचे दागिने

विश्वासघात! गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत दिरानेच चोरले वहिनीचे दागिने

छत्रपती संभाजीनगर : गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात आलेल्या नातेवाइकांच्या उपस्थितीचा फायदा घेत दिरानेच मोठ्या वहिनीचे दोन तोळ्यांचे दागिने चोरले. ही घटना २३ जून रोजी रांजणगाव परिसरात घडली. या घटनेचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने दिरालाच अटक केली. त्याच्याकडून २ तोळे दागिनेही हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

मेहराज दस्तगीर पठाण (२०) असे आरोपी दिराचे नाव आहे. फिर्यादी अबूदर दस्तगीर पठाण (रा. पवननगर, रांजणगाव शे.पु.) यांनी २३ जून रोजी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात दोन तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा नोंदवला होता. चोरीची घटना १७ जून रोजी घडली होती. फिर्यादीची घरभरणी होती. कार्यक्रमासाठी त्यांचे सर्व नातेवाइकही जमले होते. या गडबडीमध्ये दीर मेहराज पठाण याने वहिनीचे जवळपास २० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ, हवालदार बाळू लहरे, विजय निकम, विजय भानुसे, मनोहर गिते, कृष्णा गायके, रूपाली राणे यांच्या पथकाने समांतर तपास केला. त्यात दिरानेच दागिने चाेरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला.

सराफाला शंका आली अन्...
ते दागिने विकण्यासाठी दीर एका सराफा व्यापाऱ्याकडे गेला होता. सराफा व्यापाऱ्यास सोन्याविषयी शंका आल्यानंतर त्याने गुन्हे शाखेच्या पथकास संपर्क साधला. त्यावरून गुन्हे शाखेने छापा मारून आरोपीस ताब्यात घेतले. तेव्हा आरोपीकडे वहिनीचे चोरलेले दागिने आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Betrayal! Taking advantage of the crowd at the housewarming event, brother-in-law stole sister-in-law's jewelry