धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 21:23 IST2025-08-14T21:22:32+5:302025-08-14T21:23:01+5:30
याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. राजेभाऊ फड व करुणा मुंडे यांच्याकडून माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर : माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांना त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत लेखी उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली हाेती. परंतु मुंडे यांच्याकडून लेखी उत्तर दाखल करण्यात आले नाही. या प्रकरणात मुंडे यांच्याकडून १० हजार रुपये वसूल (काॅस्ट-शास्ती) करून संबंधित रक्कम खंडपीठ वकील संघास द्यावे, असे आदेश न्या. अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत.
याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. राजेभाऊ फड व करुणा मुंडे यांच्याकडून माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. बोगस मतदान व शपथपत्रामध्ये खोटी माहिती दडवून ठेवल्याच्या आरोप करत मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीतील निवडीला आव्हान दोन्ही याचिकेत देण्यात आले आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी न्यायालयाने मुंडे यांना नोटिसा काढून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यांना त्या नोटिसा प्राप्त होऊनही लेखी उत्तर दाखल केले नाही.
अखेर ८ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने मुंडे यांना दोन्ही याचिकेत प्रत्येकी ५ हजार असे एकूण १० हजार रुपये वसूल करण्याचे आदेश काढले आहेत. ही रक्कम खंडपीठ वकिल संघाला देण्याचे आदेशात नमूद केले. याचिकाकर्त्या करुणा मुंडे यांच्याकडून ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी तर राजेभाऊ फड यांच्या वतीने ॲड. सिद्धार्थ यावलकर यांनी काम पाहिले.