इन्स्टाग्रामवरील जाहिरातीने विश्वासघात, तरुणीला १८० रुपये देऊन १ लाख ७६ हजार उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:48 IST2025-11-01T14:45:42+5:302025-11-01T14:48:02+5:30
'वर्क फ्रॉम होम'च्या नादात व्यावसायिक तरुणी जाळ्यात! १८० रुपये देऊन विश्वास जिंकला आणि दोन दिवसांत १.७६ लाख उकळले

इन्स्टाग्रामवरील जाहिरातीने विश्वासघात, तरुणीला १८० रुपये देऊन १ लाख ७६ हजार उकळले
छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवरील वर्क फ्रॉम होमच्या जाहिरातीवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. रेटिंगचे काम करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून १८० रुपये पाठवून विश्वास जिंकत दोन दिवसांत १ लाख ७६ हजार रुपये उकळले. याप्रकरणी गुरूवारी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हर्सूल परिसरात राहणाऱ्या या तरुणीचा सूतगिरणी चौकात व्यवसाय आहे. २४ ऑक्टोबर रोजी तिला इंस्टाग्रामवर रिल्स पाहताना वर्क फ्रॉम होमची जाहिरात दिसली. त्यात देशभरातील हॉटेल्सला रेटिंग देऊन घरबसल्या रोज ५ ते ८ हजार रुपये कमावण्याचे आश्वासन दिले होते. तरुणीने लिंकवर क्लिक केले. त्यात एका हॉटेलचे पेज ओपन झाले. सायबर गुन्हेगारांनी त्याला रेटिंग देऊन स्क्रीनशॉट व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकण्यास सांगितले. ते सांगत असल्यानुसार तरुणी सर्व प्रक्रिया पार पाडत गेली. त्यात तिच्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर तिला १८० रुपये पाठवण्यात आले. त्यामुळे तरुणीचा अधिकच विश्वास बसला.
पैसे मागण्यास सुरुवात
पैसे पाठवून धरणी गोखले नामक व्यक्तीने तिला पुन्हा ८ ‘टास्क’ दिले. त्यासाठी ११ हजार रुपये भरून दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. तरुणीने तत्काळ त्यांना ११ हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपी सातत्याने टेलिग्रामद्वारे संपर्क करु लागले. गोखलेनंतर अनिषा टापा नामक व्यक्तीने संपर्क करुन १ लाख ६५ हजार रुपये पाठवल्यास आम्ही तुम्हाला २ लाख २९ हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले. त्याच्यावरही तरुणीने विश्वास ठेवत पैसे पाठवले. परंतु एकही रुपये मिळाला नाही. टेलिग्राम चॅनलवर सातत्याने पैशांची मागणी सुरू झाल्याने आपण फसलो गेल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने हर्सूल पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांच्याकडे तक्रार केली. केदार यांनी तत्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.