‘ब्यूटिफुल प्लेस इन द वर्ल्ड इज अजंता’; ३० देशांच्या राजदूतांनी न्याहाळले अजिंठा लेणीचे सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:16 IST2025-11-24T13:15:17+5:302025-11-24T13:16:40+5:30
पद्मपाणी पेटिंग ‘सुपर’, कशी कोरली लेणी?

‘ब्यूटिफुल प्लेस इन द वर्ल्ड इज अजंता’; ३० देशांच्या राजदूतांनी न्याहाळले अजिंठा लेणीचे सौंदर्य
छत्रपती संभाजीनगर : ‘ऐक्यम २०२५’च्या निमित्ताने शहरात आलेल्या जगभरातील ३०हून अधिक देशांचे सांस्कृतिक राजदूतांनी रविवारी अजिंठा लेणीला भेट देऊन तेथील अद्वितीय वारसा अनुभवला. मनोहर चित्रकला, सूक्ष्म शिल्पकाम आणि लेणीच्या कलात्मक रचनेने भारावून गेलेल्या या प्रतिनिधींनी जगभरातील वारसास्थळांमध्ये अजिंठा लेणी सर्वाधिक अप्रतिम असल्याचे म्हटले. ‘ब्यूटिफुल प्लेस इन द वर्ल्ड इज अजंता’ अशा शब्दांत अजिंठा लेणींचे भावपूर्ण वर्णन केले.
भारताच्या माजी राजदूत मोनिका कपिल मोहता आणि सांस्कृतिक उद्योजक सिद्धांत मोहता यांनी स्थापन केलेल्या, 'ऐक्यम’ने यंदा पर्यटननगरीछत्रपती संभाजीनगरमध्ये आगळावेगळा सांस्कृतिक प्रवास घडविला. युनेस्को, महाराष्ट्र पर्यटन आणि छत्रपती संभाजीनगर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय संस्कृतिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी, रविवारी ३० हून अधिक देशांतून आलेल्या पाहुण्यांनी अजिंठा लेणीला भेट दिली. यावेळी गाइड उमेश जाधव, विवेक पाठक, संजय वासवानी, माया नरसापूरकर यांनी अजिंठा लेणीचा इतिहास उलगडून सांगितला. यावेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे (अजिंठा लेणी) संरक्षण सहायक मनोज पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पद्मपाणी पेटिंग ‘सुपर’, कशी कोरली लेणी?
पाहुण्यांनी अजिंठा लेणी क्रमांक -१, लेणी क्रमांक-२, लेणी क्रमांक -१० आणि लेणी क्रमांक-१७ पाहिली. लेणीतील जगप्रसिद्ध ‘पद्मपाणी’ पाहुण्यांसाठी सर्वाधिक आकर्षण ठरले. ही पेटिंग पाहताना ‘सुपर’ असे शब्द पाहुण्यांच्या मुखातून बाहेर पडले. राजदूतांनी या चित्रांच्या सौंदर्याने मोहित होत त्यामागील ऐतिहासिक संदर्भांची माहिती जाणून घेतली. ही भव्य दिव्य लेणी कशी कोरली, असा प्रश्नही काहींनी विचारला.