मराठवाड्याचा 'टँकरवाडा' कलंक पुसणार!; लातूर-नांदेडसाठी १२,४०० कोटींचा मेगा प्लॅन तयार

By बापू सोळुंके | Updated: March 20, 2026 18:48 IST2026-03-20T18:47:34+5:302026-03-20T18:48:25+5:30

गोदावरीचे पाणी ८५ किमी पाईपलाईनने दुष्काळी भागात नेणार; १२,४०० कोटींचे ३ नवीन जलप्रकल्प प्रस्तावित,पाहा सविस्तर आराखडा

Beating the Drought in Marathwada! Nanded-Latur to Get ₹12.4k Crore Boost for Irrigation and Drinking Water | मराठवाड्याचा 'टँकरवाडा' कलंक पुसणार!; लातूर-नांदेडसाठी १२,४०० कोटींचा मेगा प्लॅन तयार

मराठवाड्याचा 'टँकरवाडा' कलंक पुसणार!; लातूर-नांदेडसाठी १२,४०० कोटींचा मेगा प्लॅन तयार

 

छत्रपती संभाजीनगर : नांदेड आणि लातूर जिल्ह्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने तीन नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.प्रत्येक प्रकल्पाची क्षमता ५० दलघमी आहे. या तीन प्रकल्पांसाठी सुमारे १२ हजार ४०० कोटी रुपये गुंतवणूक होत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. मागील ५० वर्षांच्या कालावधीत केवळ १२ ते १५ वर्षेच मराठवाड्यात मुबलक पाऊस पडला आहे. उर्वरित कालावधीत कमी किंवा सामान्य पाऊस पडला आहे. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षी लातूर जिल्ह्यात कमी पावसामुळे गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मांजरा प्रकल्प कोरडा पडला होता. भूजल स्तर कमालीचा घटला होता. यामुळे लातूरकरांची तहान भागविण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत दरवर्षी अनेक गावांना टँकरद्वारेच पाणी पुरवावे लागते. यामुळे मराठवाड्याला टँकरवाडा, दुष्काळवाडा अशी दुषणे दिली जातात. यावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा विभागाने नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी तीन प्रकल्प प्रस्तावित केले असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

असे आहेत प्रस्तावित तीन प्रकल्प
नांदेड- अहमदपूर प्रकल्प

नांदेडमधून वाहणाऱ्या गोदावरीचे तेलंगणात वाहून जाणारे ५० दलघमी पाणी वंकेश्वर बंधाऱ्याजवळ पंपहाऊसद्वारे उचलून ८५ किलोमीटरवरील दुष्काळग्रस्त अहमदपूर तालुक्यात नेणे. तेथील पेयजल आणि सिंचनासाठी याचा वापर करणे, यासाठी अहमदपूर तालुक्यात स्टोअरेज टँक बांधले जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ४ हजार ४०० कोटी रुपये.

नांदेड- लोहा प्रकल्प
नांदेडमधील गोदावरी नदीचे वाहून जाणारे, पुराचे ५० दलघमी पाणी लोहा तालुक्यात नेऊन तेथील जनतेच्या पेयजल आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. याकरिता नांदेड येथून लोह्यापर्यंत सुमारे ८५ किमीची पाइपलाइन टाकली जाईल. या प्रकल्पाची किंमत सुमारे ४ हजार कोटी रुपये आहे.

मुळी बंधारा ते मांजरा खोरे
लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीचे खोरे हे तुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या खोऱ्यात पाणी उपलब्ध करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मुळी बंधाऱ्यातून सुमारे ८५ किलोमीटर वरील मांजरा खोऱ्यात ५० दलघमी पाणी आणले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title : मराठवाड़ा से 'टैंकर क्षेत्र' का दाग मिटेगा: ₹12,400 करोड़ की जल योजना

Web Summary : नांदेड़ और लातूर का जल संकट ₹12,400 करोड़ की तीन परियोजनाओं से खत्म हो सकता है। गोदावरी का पानी पाइपलाइनों और भंडारण टैंकों के माध्यम से सूखाग्रस्त क्षेत्रों में भेजा जाएगा, जिससे पेयजल और सिंचाई की जरूरतें पूरी होंगी। इसका उद्देश्य मराठवाड़ा से 'टैंकर क्षेत्र' का कलंक मिटाना है।

Web Title : Marathwada to Erase 'Tanker Region' Tag: ₹12,400 Crore Water Plan

Web Summary : Nanded and Latur's water crisis may end with three projects worth ₹12,400 crore. Godavari's water will be diverted to drought-prone areas via pipelines and storage tanks, addressing drinking water and irrigation needs. This aims to remove the 'tanker region' stigma from Marathwada.