वाघ अन् चोरापेक्षा भाजपपासून सावध राहा, आजोबांचा सल्ला खरा ठरला: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 18:59 IST2026-02-02T18:58:23+5:302026-02-02T18:59:44+5:30
शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही: हर्षवर्धन सपकाळ

वाघ अन् चोरापेक्षा भाजपपासून सावध राहा, आजोबांचा सल्ला खरा ठरला: हर्षवर्धन सपकाळ
फुलंब्री/खुलताबाद : ‘माझ्या आजोबांनी मला वाघ अन् चोरापेक्षा भाजपवाल्यांपासून सावध राहण्यास सांगितले होते, ते शब्द आज खरे ठरत आहेत,’ अशी परखड शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणोरी आणि बाजारसावंगी येथे आयोजित प्रचारसभांत ते बोलत होते.
सपकाळ म्हणाले, भाजपने समाजात हिंदू- मुस्लीम आणि विविध जातींमध्ये तेढ निर्माण करून सत्ता हस्तगत केली आहे. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नसलेले लोक आज देश विकायला निघाले आहेत. बाजारसावंगी येथील सभेत त्यांनी भाजपसह एमआयएमवरही निशाणा साधला. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे बोलत सपकाळ यांनी मुख्यमंत्री व सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला.
यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी आक्रमक होत, ‘आमदारांना सर्वच सत्तास्थाने आपल्याच घरात हवी आहेत, ते सामान्य कार्यकर्त्यांना संधी देत नाहीत,’ अशी टीका केली. जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर यांनी खते व बियाण्यांच्या वाढत्या किमती आणि शेतीमालाच्या पडलेल्या भावावरून सरकारला धारेवर धरले. या सभांना जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांचे उमेदवार व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.