सावधान! आधार कार्डचा गैरवापर करून परस्पर उचलले कर्ज, वसुलीसाठी बँक अधिकारी आले दारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:15 IST2022-05-14T19:14:30+5:302022-05-14T19:15:06+5:30
सायबर चोरट्याने आधार कार्डसोबत बोगस मोबाईल व ईमेल आयडीचा वापर केला

सावधान! आधार कार्डचा गैरवापर करून परस्पर उचलले कर्ज, वसुलीसाठी बँक अधिकारी आले दारात
सिल्लोड: फसवणूकीचे विविध फंडे वापरून सायबर भामटे नागरिकांना गंडवीत असल्याची अनेक प्रकरणे उजेडात येत आहेत. असेच फसवणुकीचे एक प्रकरण मांडणा येथे पुढे आले आहे. येथील एका व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर अज्ञाताने ऑनलाईन कर्ज काढले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
देविदास शिवाजी हिवाळे (रा. मांडणा ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) हे एका खाजगी कंपनीमध्ये मार्केटिंगची नोकरी करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे बँकेचे अधिकारी १५ हजार दुपायांच्या थकीत कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी घरी आले. मात्र त्यांनी कर्ज घेतले नसल्याचे सांगितले. यावेळी अधिक माहिती घेतली असता हिवाळे यांच्या आधार कार्डचा आणि बोगस मोबाईल व ईमेल आयडीचा अज्ञाताने ऑनलाईन कर्ज देणाऱ्या धनीॲपसाठी वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. कर्ज दुसऱ्याने घेऊन फसवणूक केल्याने मी हप्ते कसे भरू? असा प्रश्न हिवाळे यांनी बँक अधिकाऱ्यांना केला.
ईमेल आयडी, मोबाईल नंबर बोगस
दरम्यान, ॲप कंपनीच्या जॉबसाठी हिवाळे यांनी अर्ज केला होता. त्यावेळी ॲपवर आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो अपलोड केले होते. परंतु या ॲपच्या माध्यमातून त्यांच्या आधार कार्ड व पॅनकार्डचा कोणीतरी कर्ज काढण्यासाठी गैरवापर करत १५,०१० (पंधरा हजार दहा) रुपयांचे कर्ज काढले.