बळीराजा पेरता झाला; मराठवाड्यात आतापर्यंत ३ टक्के क्षेत्रावर पेरणी, सोयाबीनला पहिली पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:40 IST2025-06-17T19:39:46+5:302025-06-17T19:40:36+5:30
मराठवाड्यात खरीप हंगामात तब्बल ४९ लाख ७३ हजार ७२ हेक्टर क्षेत्रावर शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची पेरणी करतात. आतापर्यंत १.४९ लाख हेक्टरवर पेरणी

बळीराजा पेरता झाला; मराठवाड्यात आतापर्यंत ३ टक्के क्षेत्रावर पेरणी, सोयाबीनला पहिली पसंती
छत्रपती संभाजीनगर : मृग नक्षत्राचे पहिले आठ दिवस कोरडे गेल्यानंतर मराठवाड्यात पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली अन् बळीराजा पेरता झाला. मागील आठ दिवसांत मराठवाड्यात एक लाख ४९ हजार ५०९ हेक्टरवर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी झाली. मराठवाड्यातील खरीप हंगामातील पेरणीयोग्य एकूण क्षेत्राच्या २.३० टक्के क्षेत्रावर ही पेरणी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
मे महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना या कालावधीत शेतीच्या मशागतीची कामे करता आली नव्हती. मे मधील पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी मशागतीच्या कामाला लागले. मराठवाड्यात खरीप हंगामात तब्बल ४९ लाख ७३ हजार ७२ हेक्टर क्षेत्रावर शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची पेरणी करतात. यात सर्वाधिक २२ लाख ९८ हजार १५५ हेक्टर क्षेत्र साेयाबीनचे आहे. आतापर्यंत ६७ हजार ५३९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती कापसाला आहे. मराठवाड्यात सरासरी १४ लाख ७९ हजार ५३५ हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. कालपर्यंत १ लाख २९ हजार ८२७ हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली. नगदी पीक म्हणून मका पिकाची शेतकरी निवड करतात. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत सुमारे अडीच लाख हेक्टरवर मका लागवड होते. यावर्षी आतापर्यंत मक्याची सरासरी पेरणी केवळ ३ टक्के झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून तूर लागवड वाढत आहे. यंदा सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने नोंदवला आहे. तुरीला आंतरपीक म्हणूनही शेतकरी पसंती देतात.
जिल्हा----------- खरीप हंगामाचे क्षेत्र हेक्टरमध्ये------ आजपर्यंतचे पेरणी क्षेत्र
छ. संभाजीनगर--६,८१ ९०३---२१०३३
जालना-- ६,५११७३ ------२१७४८
बीड--- ८,०८९४५ ------४८८५
लातूर-- ५,८६१०१--- ७२९२
धाराशिव-- ५,५४१६०--- ७२५९७
नांदेड---७,६१५७६--- ११६४
परभणी--- ५,१८४६८--- ११३८४
हिंगोली-- ४,१०३९८--- ४०६
सरासरी एकूण क्षेत्र ४९,६२७२७ हेक्टर
प्रत्यक्ष पेरणी -- १४९५०९ हेक्टर
प्रत्यक्ष पेरणीची टक्केवारी- २.३०