इव्हेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष, बहीण-भावाने तरुणाला घातला १७ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:37 IST2026-02-16T19:36:34+5:302026-02-16T19:37:41+5:30
तीनपेक्षा अधिक दिलेले धनादेशही वटले नाहीत : सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इव्हेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष, बहीण-भावाने तरुणाला घातला १७ लाखांचा गंडा
छत्रपती संभाजीनगर : इव्हेंट कंपनीत गुंतवणूक करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून बहीण-भावाने मिळून हडकोत राहणाऱ्या तरुणाला १७ लाख ५१ हजारांचा गंडा घातला. शुक्रवारी संजना देवीदास चौधरी व सुयश देवीदास चौधरी (दोघे रा. व्हिस्टा रेसिडेन्सी, बाणेर, पुणे) यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
३३ वर्षीय तरुण खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याच्या भावामार्फत पुण्यातील एका बँकेत त्याची संजनासोबत ओळख झाली. संवाद वाढल्याने त्यांच्यात चांगली मैत्री झाली. तेव्हा संजनाने तिच्या इव्हेंट कंपनीबाबत त्याला माहिती दिली. काही दिवसांतच तिने मुथूट ग्रुपच्या मोठ्या इव्हेंटचे काम आल्याचे सांगून तरुणाला गुंतवणूक करण्यासाठी गळ घातली. तेव्हा तरुणाने २० मार्च ते २७ मार्चदरम्यान एकूण ५ लाख रुपये पाठवले. त्यावर बरोबरीचे नफा वाटून घेण्याबाबत संजनाने करारपत्र केले. १२ मे २०२५ रोजी एका वृत्तपत्राचा मोठा इव्हेंट मिळाल्याचे सांगून २१ मे रोजी पुन्हा तरुणाकडून ३ लाख ४० हजार रुपये घेतले.
वेगवेगळे बहाणे सांगून उकळले पैसे
संजनाने त्यानंतर तरुणाला विविध मोठ्या कंपन्यांच्या इव्हेंटचे कारण सांगून जून २०२५ पर्यंत १७ लाख ५१ हजार रुपये उकळले. वेळाेवेळी करारनामाही केला. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केली. वडिलांचे निधन झाल्याचे सांगूनही तिने वेळ मारून नेली.
एकही धनादेश वटला नाही
तरुणाने पैशांसाठी तगादा लावल्यावर संजना व सुयशने त्यांना वारंवार काही रकमांचे धनादेश दिले. मात्र, त्यातील एकही वटला नाही. तरुणाने सिडको पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. ही बाब कळाल्यावर संजनाने त्याच्याशी संपर्क साधून तक्रार मागे घेण्यास सांगून ८ नोव्हेेंबर रोजी ८० हजार रुपये देत उर्वरित रकमेचे पुन्हा तीन चेक दिले. मात्र, त्यापैकी एकही वटला नाही. सर्व इव्हेंट कामांच्या तिने बनावट ऑर्डर तयार करून तरुणाला पाठवून फसविले. विशेष म्हणजे, ही सर्व रक्कम तिने भाऊ सुयश व आईच्या बँक खात्यावर पाठवल्याचेही नंतर उघडकीस आले.