खुनात जामीन; दरोड्यात अडकले; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना सातारा पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:00 IST2025-06-21T15:53:41+5:302025-06-21T16:00:01+5:30

या आरोपींचा सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यामुळे त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

Bail in murder; Caught in robbery; Satara police arrest accused in murder case | खुनात जामीन; दरोड्यात अडकले; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना सातारा पोलिसांनी केली अटक

खुनात जामीन; दरोड्यात अडकले; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना सातारा पोलिसांनी केली अटक

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील पाच आारोपींना तांत्रिक मुद्याच्या आधारावर न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. शहर पोलिसांनी सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात खुनातील पाचही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

आरोपींमध्ये मस्तान उर्फ नन्ना हुसेन कुरेशी (२९, रा. मुकुंदवाडी, इंदिरानगर), समीर खान सरताज खान (१९, रा. ग.नं.११, मिसारवाडी), बाबर शेख अफसर शेख (३२, रा. मच्छी मार्केट, मुकुंदवाडी), साजीद कुरेशी उर्फ सज्जू अहमद कुरेशी (२९, रा. ग.न.१, अंबिकानगर, मुकुंदवाडी) आणि नासिर खान मोहम्मद मुनीर खान (२०, रा. मुकुंदवाडी) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी दत्ता जाधव यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पाच आरोपींसह एका अल्पवयीन तरुणाच्या विरोधात मुकुंदवाडी येथील खुनासह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुरुवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा नाेंदविण्यात आला होता. एमआयडीसीसह गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी सहा आरोपींना रातोरात ताब्यात घेत शुक्रवारी सकाळी ६ वाजता अटक केली. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा असल्यामुळे तपास सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्याकडे देण्यात आला. पाच आरोपींना शुक्रवारी दुपारनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना तांत्रिक मुद्याच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला.

या आरोपींचा सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यामुळे त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. या आरोपींना शनिवारी (दि. २१) न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

उच्च न्यायालयात अपील करणार
खुनासह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात पाच आरोपींना जिल्हा न्यायालयाने तांत्रिक मुद्याच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल करण्यात येणार आहे. सदरील आरोपींचा सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झालेला आहे. त्यामुळे पाचही आरोपींना अटक केलेली आहे.
- प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त, शहर पोलिस

Web Title: Bail in murder; Caught in robbery; Satara police arrest accused in murder case