प्रेयसीच्या खर्चासाठी गुन्हेगारांसोबत मैत्री करून बीएच्या विद्यार्थ्याने घेतले दुचाकी चोरीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:31 IST2025-11-28T18:29:13+5:302025-11-28T18:31:14+5:30
छत्रपती संभाजीनगरातील जवाहरनगर पोलिसांनी पकडले त्रिकूट; विकलेल्या १४ दुचाकी हस्तगत

प्रेयसीच्या खर्चासाठी गुन्हेगारांसोबत मैत्री करून बीएच्या विद्यार्थ्याने घेतले दुचाकी चोरीचे धडे
छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीवरील खर्चासाठी नशेच्या आहारी गेलेल्या बी.ए. च्या विद्यार्थ्याने गुन्हेगारांसोबत मैत्री करून दुचाकी चोरीचे धडे घेतले. गेल्या पाच महिन्यांत विविध ठिकाणांवरून १४ दुचाकी चोरून त्यांनी प्रेयसी व नशापाणीवर पैसे उडवले. जवाहरनगर पोलिसांनी यात तपास करत समर्थ विनोद काळे (२२, मूळ रा. राजाबाजार, ह. मु. सिल्लेखाना), पवन परमेश्वर चौधरी (१८, रा. बेगमपुरा) आणि सोहेल शैकद बेग (२७, रा. छावणी) या त्रिकुटाला अटक करत सर्व दुचाकी हस्तगत केल्या.
शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याची स्थिती आहे. १७ नोव्हेंबर रोजी अमोल डाके (रा. खातगाव) हे गजानन महाराज परिसरातील एका रुग्णालयात आले असताना भरदिवसा त्यांची दुचाकी चोरीला गेली. पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या सूचनेवरून अंमलदार अनिल भाले, मारोती गोरे यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरांचा माग काढण्यास सुरूवात केली. त्यात रेकॉर्डवरील दुचाकी चोर समर्थ कैद झाला. त्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अधिक तपासात त्यांना पहिले पवनची ओळख पटली व त्यांनी थेट त्याच्या घरातून मुसक्या आवळत नंतर त्याच्या माध्यमातून समर्थलाही पकडले. अंमलदार मारोती गोरे, अनिल भाले, इंदलसिंग महेर, संदीप बिलारी, प्रवीण कापरे, मंगेश घुगे, सतीष सानप, विजय सुरे यांनी ही कारवाई केली.
दुचाकीचे कागदपत्र मिळवून विक्री
चौकशीत पवन, समर्थने चोरलेल्या दुचाकी ते सोहेलला विक्री करत असल्याची कबुली दिली. छावणीचा रहिवासी असलेला सोहेल त्यांच्याकडून १५ ते २५ हजारांत दुचाकी घेऊन समोर ५० ते ६० हजारांत विक्री करायचा. विशेष म्हणजे, आरटीओतून दुचाकीचे कागदपत्रांच्या झेरॉक्सही मिळवायचा. पोलिसांनी मात्र त्याची खातरजमा केली नसल्याचे सांगितले. एपीआय कॉर्नर परिसरातील लॉजमध्ये मुक्काम ठोकून सोहेल ग्राहकांना भेटायचा. काही दुचाकी त्याने मालेगावला विक्री केल्या आहेत. सोहेल होकार देईपर्यंत चोरलेल्या दुचाकी समर्थ व पवन निर्मनुष्य परिसरात लपवून ठेवायचे.
वडिलांनी घराबाहेर काढले
समर्थवर यापूर्वी पाच ते सहा गुन्हे नोंदवलेले आहेत. त्याच्या वागण्याला कंटाळून वडिलांनी त्याला घराबाहेर काढले. ते कुरीअरच्या गाड्या चालवतात. तर पवनची व त्याची नशा करताना परिचय झाला. त्यानंतर खर्चासाठी तो समर्थसोबत दुचाकी चोरायला लागला.