जनजागृतीपर देखाव्यांनी वेधले लक्ष

By Admin | Updated: September 10, 2014 00:53 IST2014-09-10T00:36:15+5:302014-09-10T00:53:29+5:30

विसर्जन मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी सादर केलेल्या जनजागृतीपर देखाव्यांनी, पावली, लेझीम, झांज पथकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

Awareness with public awareness | जनजागृतीपर देखाव्यांनी वेधले लक्ष

जनजागृतीपर देखाव्यांनी वेधले लक्ष

औरंगाबाद : ढोल-ताशांचा गजर..लेझीम, झांज पथकाचा झंकार..गुलाल, रंगीबेरंगी फुलांची उधळण..आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत मंगलमय वातावरणात सिडको-हडको परिसरातील गणेश मंडळांनी, गणेशभक्तांनी सोमवारी लाडक्या गणरायाला जल्लोषात निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी सादर केलेल्या जनजागृतीपर देखाव्यांनी, पावली, लेझीम, झांज पथकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
सिडकोतील आविष्कार चौकातून विसर्जन मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. अयोध्यानगर, एन-७ येथील साई आदर्श गणेश मंडळाने आकर्षक पावलीने मिरवणुकीस सुरुवात केली. यावेळी मंडळाच्या पथकात ढोल, ताशे यासह विविध प्रकारची जवळपास ७० वाद्ये आणि ३०० सदस्यांचा सहभाग होता. पावलीसह याप्रसंगी मंडळाच्या सदस्यांनी विविध कसरती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. विसर्जन मिरवणूक आविष्कार चौक, बजरंग चौक, बळीराम पाटील हायस्कूल, सिडको एन-९ एम-२, टी. व्ही. सेंटर चौकमार्गे गणेश विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचली. सिडको- हडकोतील गणेश मंडळांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मंडळांचे सादरीकरण पाहण्यासाठी आविष्कार चौक, बजरंग चौक, बळीराम पाटील हायस्कूल ते टी. व्ही. सेंटर चौकापर्यंत नागरिकांची गर्दी झाली होती. टी. व्ही. सेंटर चौक येथे गणेश महासंघातर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते. खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, अतुल सावे, बसवराज मंगरुळे, राजू खरे, नगरसेवक वीरभद्र गादगे, सिडको-हडको सार्वजनिक गणेश महासंघाचे अध्यक्ष साहेबराव घोडके, सिडको व्यापारी गणेश महासंघाचे अध्यक्ष बद्रीनाथ ठोंबरे, तसेच उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
लेझीम, झांज अन् जनजागृती
एन-७ येथील युवक गणेश मंडळाच्या ढोल- ताशांच्या गजराने आविष्कार चौक परिसर दणाणून गेला होता. एन-७ येथील ‘अयोध्येचा राजा ’अयोध्यानगर गणेश मंडळाच्या पथकात अग्रभागी असलेले उंट, घोडे यासह विविध वेशभूषा केलेल्या मुलांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मंडळाच्या लेझीम पथकाने सादरीकरण करताना विविध पोस्टरच्या माध्यमातून झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, स्त्रीभ्रूणहत्या, अत्याचार थांबवा यासह विविध संदेश दिले. तसेच शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवनही मंडळाच्या पथकाने आपल्या सादरीकरणातून मांडले. गरवारे कम्युनिटी सेंटरच्या गरवारे बालभवन गणेश मंडळाच्या झांज पथकाचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. ग्रीव्हज कामगार कर्मचारी गणेश मंडळाने मिरवणुकीत पाणी वाचविण्याचा संदेश दिला. मृत्युंजय गणेश मंडळाच्या पथकाने पावली सादर केली.

Web Title: Awareness with public awareness