खंडपीठाची खासदार इम्तियाज जलीलसह निवडणूक आयोगाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:03 PM2019-07-27T12:03:53+5:302019-07-27T12:06:21+5:30

जाती, धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आरोप

Aurangabad high court's Notice to Election Commission including MP Imtiaz Jalil | खंडपीठाची खासदार इम्तियाज जलीलसह निवडणूक आयोगाला नोटीस

खंडपीठाची खासदार इम्तियाज जलीलसह निवडणूक आयोगाला नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देयाचिकेची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

औरंगाबाद : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादलोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल झाली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (दि.२६ जुलै) खासदार जलील यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. याचिकेची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

या निवडणुकीतील बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे. खासदार जलील यांची निवडणूक रद्द करण्याची विनंती त्यांनी याचिकेत केली आहे. निवडणूक प्रचारात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होईल असा प्रचार करण्यात आल्याचे याचिकेत नमूद केले आहे. 

याचिकेत असेही म्हटले आहे की, इम्तियाज जलील निवडणूक लढवीत असलेल्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दोन धर्मांत तेढ निर्माण होईल अशी भाषणे निवडणूक प्रचारादरम्यान केली. आपल्या म्हणण्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही सिडी याचिकेसोबत सादर केल्या. त्यांनी मशिदींमधूनही प्रचार केला. त्याची छायाचित्रेही याचिकाकर्त्याने सादर केली. त्यांनी मुस्लिम तसेच दलितांच्या नावावर मते मागितली. खासदार इम्तियाज जलील यांनी निवडणुकीदरम्यान ८२ हजार रुपये रोख खर्च केला. निवडणूक नियम ८७ नुसार निवडणुकीचा खर्च करण्यासाठी स्वतंत्र खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडून त्यातूनच सारा खर्च धनादेशाद्वारे करावा लागतो.

याशिवाय एक अल्पवयीन मुलगा सय्यद मोहम्मद अली हाशमी याची सिडी आफताब खान याने तयार करून ती मतदानाआधी समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) प्रसारित केली. तो एमआयएमचा कार्यकर्ता आहे. या सिडीमध्ये एमआयएमलाच मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले होते. याशिवाय धार्मिक तेढ निर्माण  होईल अशा पद्धतीची वक्तव्ये अश्लील भाषेत करण्यात आली होती. याचिकेत निवडणूक आयोग, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह निवडणुकीतील सर्वच पराभूत उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे काम पाहत आहेत. 
 

Web Title: Aurangabad high court's Notice to Election Commission including MP Imtiaz Jalil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.