दुसऱ्या मुलासोबत लग्न कसं केलं म्हणत भररस्त्यात नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 18:32 IST2025-04-29T18:31:37+5:302025-04-29T18:32:21+5:30

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे.

Attempted to kidnap bride on the street because she married another man; but it went wrong | दुसऱ्या मुलासोबत लग्न कसं केलं म्हणत भररस्त्यात नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच

दुसऱ्या मुलासोबत लग्न कसं केलं म्हणत भररस्त्यात नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच

बाजारसावंगी ( छत्रपती संभाजीनगर) : दुसऱ्या तरुणाशी लग्न केल्याच्या कारणावरून नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून चार जणांनी संगनमत करून नवरीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी नवरीच्या गाडीमधील काही जणांनी आरोपींना प्रतिकार केला. यामुळे अरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. ही घटना खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील पुलाजवळ नुकतीच घडली. 

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. आकाश मते, ज्ञानेश्वर मते, एजाज आयुब शहा (सर्व रा. बिल्डा, ता. फुलंब्री) कासीफ आसीफ खान, विनोद कसारे (दोघेही रा. फुलंब्री), राेहित बाळू भालेराव, (रा. इंदापूर, ता. खुलताबाद), अशी आरोपींची नावे असून, यातील चौघांना शनिवारी अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात बीट जमादार नवनाथ कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश या तरुणाचे पिशोर येथील एका तरुणीसोबत प्रेम होते; परंतु सदर तरुणीचे लग्न बाजारसावंगी येथील एका तरुणासोबत शुक्रवारी दुपारी पार पडले. त्यानंतर हे नवदाम्पत्य बाजारसावंगीकडे कारने (एमएच २८ एझेड ६६९९) येत होते. ही कार सायंकाळी ०५:३० वाजेच्या सुमारास बाजारसावंगी येथील पुलाजवळ येताच आकाश याच्यासह आरोपींनी या नवदाम्पत्याची गाडी अडवली. नवरदेवासह गाडीमधील इतरांना धमकावून आरोपींनी नवरीला गाडीबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवरदेवाच्या गाडीतील इतरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी बाजारसावंगी येथील राहुल नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पाच आरोपींविरोधात खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामस्थांनी यथेच्छ धुलाई करून आरोपींना पिटाळले
या घटनेची माहिती मिळताच बाजारसावंगी येथे आठवडी बाजारासाठी आलेल्या अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींची यथेच्छ धुलाई करून त्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर आरोपींमधील एकास पकडून ग्रामस्थांनी बाजारसावंगी पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी उर्वरित चार आरोपी पळून गेले.

Web Title: Attempted to kidnap bride on the street because she married another man; but it went wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.