माझ्याकडे का पाहिले म्हणत मुलाचा कान, नाक कापायचा प्रयत्न; नशेखोराचे अघोरी कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:06 IST2025-09-25T12:06:04+5:302025-09-25T12:06:42+5:30
जखमीच्या नाक, कानाला २१ टाके, वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, सिडको पोलिसांकडून आरोपीस अटक

माझ्याकडे का पाहिले म्हणत मुलाचा कान, नाक कापायचा प्रयत्न; नशेखोराचे अघोरी कृत्य
छत्रपती संभाजीनगर : तुम्ही माझ्याकडे का पाहिले, असे विचारत एका टवाळखोर नशेखोराने अठरावर्षीय तरुणाच्या चेहरा, डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. त्याऱ्या नाक, कानावर गंभीर वार करीत ते कापण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने तरुणाचा प्राण वाचला. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०६:३० वाजता एन-५ च्या जिजामाता शाळेसमोर ही गंभीर घटना घडली. राम मोतीराम मुंढे (रा. एन-५), असे आरोपीचे नाव असून, सिडको पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.
महाविद्यालयीन शिक्षण घेणारा सोहम सचिन कापसे (१८, रा. एन-६) हा २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. सर्व मित्र मिळून एन-५ मधील जिजामाता शाळेसमोर बसलेले असताना तेथेच आरोपी रामदेखील हजर होता. तो अचानक सोहम व त्याच्या मित्रांकडे गेला. 'तुम्ही माझ्याकडे पाहताय, माझ्याविषयी काही बोलताय का' असे विचारत शिवीगाळ केली. त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, रामने खिशातून थेट धारदार शस्त्र काढून सोहमवर हल्ला चढवला. त्याच्या तोंड, कपाळ, नाक, कान व डोक्यात गंभीर वार करीत कान कापण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी धाव घेत सोहमला बाजूला घेत खासगी रुग्णालयात नेले.
कान, चेहऱ्यावर तब्बल २१ टाके
सोहमचे वडील सचिन कापसे यांना घटनेविषयी कळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सोहमला गंभीर इजा झाल्याने डॉक्टरांनी त्याला भरती करून घेतले. त्याचे कान व चेहऱ्यावर तब्बल २१ टाके पडले. त्यानंतर कापसे यांनी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत राम मुंढे याच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून राम मुंढे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नशेच्या आहारी जाऊन मुंढेकडून ही घटना घडल्याचा प्राथमिक संशय आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याचे तपास अधिकारी शिवाजी भोसले यांनी सांगितले.