मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; नगरभूमापन अधिकारी, परिरक्षक आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 20:09 IST2025-09-03T20:09:37+5:302025-09-03T20:09:45+5:30

कुठल्याच कागदपत्रांची शहानिशा, पडताळणी न करता बेजबाबदारपणे बनावट खरेदीखत करून देण्यात अप्रत्यक्ष मदत केल्याचे निष्पन्न

Attempt to build a flat by making a PR card in the name of the deceased; City Survey Officer and custodian included among the accused | मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; नगरभूमापन अधिकारी, परिरक्षक आरोपी

मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; नगरभूमापन अधिकारी, परिरक्षक आरोपी

छत्रपती संभाजीनगर : सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पवन कमलचंद पहाडे याने उस्मानपुऱ्यातील एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट पीआर कार्ड तयार करून फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न केला. २६ ऑगस्ट राेजी यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नगर भूमापन अधिकारी समीर दानेकर व परिरक्षक भूमापक अंजली एलगिरे यांचा या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश करण्यात आल्याचे उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले.

सिद्धार्थ मिश्रा (रा. ह. मु. मुंबई) यांच्या कुटुंबाचा उस्मानपुऱ्यातील गुरू तेगबहादूर स्कूलजवळील क्वीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. तेथे राहत असलेल्या त्यांचे भाऊ अनिरुद्ध यांचे ३० ऑक्टोबर, २०२२ रोजी निधन झाले. ऑगस्ट, २०२५ मध्ये पहाडेने सोसायटीला सदर फ्लॅट विकत घेतल्याचे सांगत पेढे वाटले. ही बाब कळल्यानंतर मुंबईत स्थायिक झालेल्या मिश्रा यांनी शहरात येत तपासणी केली. त्यात पहाडेने बनावट खरेदीखत तयार करून १७ जूनला सिटी सर्व्हे कार्यालयात नोंद केल्याचे उघडकीस आले. २० फेब्रुवारीला नगर भूमापन कार्यालयात स्वत: अर्ज देत, अनिरुद्ध यांची खोटी सही करत त्याने फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न केला.

यात गुन्हा दाखल होताच पहाडेला अटक झाली. पोलिसांनी महसूल विभागाला पत्र पाठवून या प्रक्रियेसंदर्भात माहिती मागवली. त्यात दानेकर व एलगिरे दोघांनी पहाडेच्या कुठल्याच कागदपत्रांची शहानिशा, पडताळणी न करता बेजबाबदारपणे बनावट खरेदीखत करून देण्यात अप्रत्यक्ष मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले. अटकेसाठी त्यांचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले.

Web Title: Attempt to build a flat by making a PR card in the name of the deceased; City Survey Officer and custodian included among the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.