मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; 'सिटी सर्व्हे'च्या अधिकाऱ्यांची मिलिभगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:40 IST2025-08-28T13:39:50+5:302025-08-28T13:40:00+5:30
उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पहाडेसह सिटी सर्व्हे कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; 'सिटी सर्व्हे'च्या अधिकाऱ्यांची मिलिभगत
छत्रपती संभाजीनगर : सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पवन कमलचंद पहाडे याने उस्मानपुऱ्यातील एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट पीआर कार्ड तयार करून फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पहाडेसह सिटी सर्व्हे कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पहाडेला अटक करण्यात आली.
सिद्धार्थ रमेश मिश्रा (रा. ह. मु. मुंबई) यांच्या कुटुंबाचा उस्मानपुऱ्यातील गुरू तेगबहादूर स्कूलजवळील क्वीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्यांचे मोठे भाऊ अनिरुद्ध यांनी सदर फ्लॅट २०१५ मध्ये विकत घेतला होता. मात्र, सिटी सर्व्हे कार्यालयात त्याची नोंद केली नव्हती. त्यादरम्यान सिद्धार्थ नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झाले. आजारपणामुळे अनिरुद्ध यांचे ३० ऑक्टोबर, २०२२ रोजी निधन झाले तेव्हापासून हा फ्लॅट बंद होता. ऑगस्ट, २०२५ मध्ये अचानक त्यांचा फ्लॅट पहाडे नामक गृहस्थाने विकत घेतला असून तो सोसायटीत पेढे वाटत असल्याचे समजले. हे ऐकून धक्का बसल्याने मिश्रा कुटुंब तातडीने शहरात आले.
कागदपत्रे बनावट
मिश्रा कुटुंबाने फ्लॅटची पाहणी केली असता त्यांच्या भावाचे सर्व साहित्य तसेच होते. सिटी सर्व्हे कार्यालयात तपासणी केली. त्यात पहाडेने बनावट खरेदीखत तयार करून ते सादर करत १७ जूनला सिटी सर्व्हे कार्यालयात नोंद केल्याचे उघडकीस आले. २० फेब्रुवारीला नगर भूमापन कार्यालयात स्वत: अर्ज देत, अनिरुद्ध यांची खोटी सही करत त्याने ही प्रक्रिया पार पाडली. मिश्रा कुटुंबाने उस्मानपुऱ्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्याकडे तक्रार केली. कागदपत्रांची खातरजमा करून येरमे यांनी पहाडेला गुन्हा दाखल करून अटक केली.