शिवशंकर कॉलनीत सात वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 20:56 IST2018-12-12T20:55:37+5:302018-12-12T20:56:06+5:30
याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली.

शिवशंकर कॉलनीत सात वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न
औरंगाबाद : खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून सात वर्षीय बालिकेवर तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास शिवशंकर कॉलनीत घडली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली.
करण टिल्लू घोडके (२०, रा. शिवशंकर कॉलनी) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, पीडित बालिका शहरातील एका नामांकित शाळेत पहिल्या वर्गात शिकते. शेजारी महिलेने मंगळवारी सायंकाळी पूजेनिमित्त त्या बालिकेला घरी बोलावले होते. तिच्या वयाच्या अन्य तीन बालिकेसोबत तीही त्या घरी गेली होती. त्या महिलेच्या घरात आरोपी करण भाडेकरू आहे. त्या घरात सर्वच चिमुकल्या मैत्रिणी बसल्या होत्या. तेव्हा करणने त्यांना त्याच्या खोलीत बोलावले. तिच्यासोबतच्या दोन मुलींना प्रत्येकी शंभर रुपये देऊन त्यांना सुटे पैसे आणण्यासाठी त्याने बाहेर पाठवून दिले.
त्यानंतर एकट्या चिमुरडीवर त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घाबरून ती रडायला लागली. बाहेर गेलेल्या मुली काही वेळातच परत आल्याने आरोपीने तिला सोडून दिले. ती त्यांच्यासोबत रडतच घरी आली. आईला पाहून तिने हंबरडाच फोडला. आईने तिला जवळ घेऊन विचारले, तेव्हा तिने घडलेला प्रसंग सांगितला. आई मुलीला घेऊन तात्काळ शेजाऱ्याच्या घरी गेली, तेव्हा भाडेकरू करणने हे घाणेरडे कृत्य केल्याचे त्यांना समजले. मात्र तो त्यावेळी घरी नव्हता. मुलगी प्रचंड घाबरल्याने तिच्या आई-बाबांनी रात्री पोलिसांत तक्रार केली नाही. बुधवारी सकाळीच नराधमाला पकडून चोप देऊन त्याच्याविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मीरा लाड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.