छत्रपती संभाजीनगर : मदतीच्या बहाण्याने एटीएम सेंटरमध्ये कार्डची अदलाबदल करून फसविणाऱ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. १९ ऑगस्टला दुपारी एक वाजता शहागंजमधील एसबीआय एटीएम सेंटरमध्ये एका शासकीय कर्मचाऱ्यासोबत हा प्रकार घडला. त्यांचे ४० हजार रुपये लंपास झाले.
मुदखेडच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत सय्यद सलीम अत्ताउल्ला (वय ५४, रा. कटकट गेट) हे वैद्यकीय रजेवर १५ ऑगस्टला शहरात आले होते. १९ ऑगस्टला ते शहागंज येथील एसबीआय एटीएम सेंटरमध्ये पासवर्ड बदलण्यासाठी गेले होते. ही प्रक्रिया करीत असताना त्यांच्या मागे एक अज्ञात जाऊन उभा राहिला. त्याने त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला. ते करीत असताना मदतीच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड हातात घेऊन स्वत: प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही क्षणांत त्यांच्या हातावर कार्ड टेकवून चालल्या गेला.
बँकेत उभे असतानाच चोराने पैसे लंपास केलेकार्ड चालत नसल्याने घाबरून सय्यद सलीम यांनी तत्काळ जवळच्याच बँकेत धाव घेत तक्रार केली. तेव्हा व्यवस्थापकाने कार्ड पाहून ते जयकुमार पाईकराव या व्यक्तीच्या नावे असल्याचे सांगितले. त्याच दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून चार टप्प्यात लुटारूने ४० हजार रुपये काढून घेतले. सिटीचौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
यापूर्वी टोळ्यांना अटकयापूर्वी शहरात अनेक एटीएम सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिक, तरुणांसोबत फसवणूक होत लाखो रुपये लंपास केले गेले. यात केवळ सिडको पोलिसांनी परराज्यातील टोळीला अटक केली. मात्र, त्यात पैशांची जप्ती होऊ शकली नाही. त्या अटकेनंतर आता पुन्हा अशा टोळ्या शहरात सक्रिय झाल्या आहेत.