एटीएम कार्ड खिशात तरी सव्वातीन लाख खात्यातून गायब; क्लोनिंगद्वारे फसवणुकीचा प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 14:14 IST2022-05-06T14:12:55+5:302022-05-06T14:14:17+5:30
बँकेच्या वेगवेगळ्या खातेधारकांचे खात्यावरून एकूण ३ लाख २४ हजार ७०० रुपये एटीएम कार्ड क्लोन करून काढले गेल्याचे उघडकीस आले.

एटीएम कार्ड खिशात तरी सव्वातीन लाख खात्यातून गायब; क्लोनिंगद्वारे फसवणुकीचा प्रकार उघड
औरंगाबाद : एटीएम कार्ड क्लोन करून भामट्याने ग्राहकांच्या खात्यातून ३ लाख २४ हजार ७०० रुपये लंपास केले. ही घटना ५ नोव्हेंबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ या काळात सेव्हन हिल भागातील लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या एटीएममध्ये घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये भामटा पैसे काढताना कैद झाला आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात ४ मे रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
किशोर बळीराम वैद्य हे लोकविकास नागरी सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. २७ जानेवारी २०२२ रोजी ते बँकेत असताना छत्रपती राजर्षी शाहू बँक, शाखा वाळूजचे व्यवस्थापक थोरे व करपे हे बँकेत आले. त्यांनी वैद्य यांना सांगितले की, २६ जानेवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या बँकेचे खातेदाराचे एटीएम कार्ड खातेधारक जवळ असताना लोकविकास बँकेजवळील एटीएममधून कोणीतरी पैसे काढले आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्टँडर्ड अर्बन लि. शाखा एमजीएम कॅम्पसचे आयटी अधिकारी शैलेश यांनी देखील कळविले की, त्यांच्या बँकेच्या खातेधारकांचे एटीएम कार्ड त्यांच्याकडेच असताना याच एटीएममधून ६ हजार कोणीतरी काढले. दोन्ही घटनांबाबत वैद्य यांनी त्यांचे आयटी मॅनेजर चव्हाण यांना माहिती दिली. तसेच लोकविकास बँक सर्वत्र टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे एटीएम स्वीच वापरत असल्याने त्या कंपनीतील गणेश भंगाळे यांना कळविले.
तेव्हा कोणीतरी एटीएम कार्ड क्लोन करून खातेधारकांचे पैसे काढल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वैद्य यांनी सखोल पाहणी केली असता बँकेच्या वेगवेगळ्या खातेधारकांचे खात्यावरून एकूण ३ लाख २४ हजार ७०० रुपये एटीएम कार्ड क्लोन करून काढले गेल्याचे उघडकीस आले. २६ जानेवारीचे लोकविकास बँकेच्या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एकजण बराच वेळ थांबलेला दिसून आला. त्याने २-३ एटीएम कार्ड वापरुन पैसे काढून खिशात टाकताना दिसत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास निरीक्षक राजेश मयेकर करीत आहेत.