अथर एनर्जीने बिडकीन डीएमआयसीतील १०० एकर जमिनीचा घेतला ताबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 19:39 IST2024-08-02T19:39:08+5:302024-08-02T19:39:45+5:30
अथर एनर्जीने बिडकीन येथील प्रकल्पात सन २०२६ पासून उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

अथर एनर्जीने बिडकीन डीएमआयसीतील १०० एकर जमिनीचा घेतला ताबा
छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीमधील अग्रगण्य अथर एनर्जीने डीएमआयसीमध्ये दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा जूनच्या शेवटच्या आठवड्यात केली होती. ‘अथर’ ग्रुपने आता प्रकल्प साकारण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत गुरुवारी बिडकीन डीएमआयसीमधील १०० एकर जमिनीचा ऑरिककडून अधिकृत ताबा घेतला.
ऑरिक सिटीच्या बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात दहा हजार एकर जमीन संपादित केलेली आहे. यातील शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील ९० टक्के जमिनीचे वाटप झाले आहे. यामुळे ऑरिकने गतवर्षीपासून बिडकीन डीएमआयसीकडे आपले लक्ष केंद्रित केले. अथर एनर्जीने बिडकीनमध्ये १०० एकरावर ईव्ही प्रकल्प उभारण्याची घोषणा २७ जून रोजी केली होती.
ऑरिक सिटीच्या वतीने दीपक मुळीकर यांनी अथरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर संजीव कुमार सिंग यांच्याकडे जमिनीचे ताबा पत्र सुपुर्द केला. गुरुवारी अधिकृत नोंदणीकृत रजिस्ट्री केल्याची माहिती ऑरिकचे मार्केटिंग अधिकारी महेश पाटील यांनी दिली. यावेळी वरिष्ठ मॅनेजर अनिल पटने, कंपनीचे अधिकारी विमल कांत आणि सौरभदेव शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन २०२६ पर्यंत अथर येथे उत्पादन
अथर एनर्जीने बिडकीन येथील प्रकल्पात सन २०२६ पासून उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रतिवर्ष एक लाख ईव्ही स्कूटरची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे. अथरच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच छत्रपती संभाजीनगरमधील एमएसएमई आणि ईव्ही उद्योगांशी संबंधित व्हेंडर्ससोबत चर्चा केली. आता जमिनीचा ताबा घेतल्याने बांधकामास सुरुवात होईल.