कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे विमान उडणार औरंगाबादेतून?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 06:26 IST2019-06-12T06:26:13+5:302019-06-12T06:26:32+5:30
३० कोटींची तरतूद : जुलै, आॅगस्टमध्ये होणार प्रयोग

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे विमान उडणार औरंगाबादेतून?
औरंगाबाद : महाराष्ट्रात या वर्षी कमी-अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी राज्य शासनाने ३० कोटींची तरतूद केली आहे. वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत या प्रयोगासाठी विमानाचे उड्डाण औरंगाबाद येथून करणयाचे निश्चित झाले आहे. जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी मागविण्यात आलेल्या निविदा १३ जून रोजी उघडण्यात येणार आहेत. १५ जून रोजी कंत्राटदार कंपनीचा निर्णय होईल. १ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात सी-बॅण्ड डॉपलर व रडार दाखल होणे शक्य आहे. येथील विमानतळावरून प्रयोगासाठी विमान उडेल. राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़ मी. च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे येथूनच प्रयोग होण्याची शक्यता आहे.
२०१५ रोजी औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, त्यातून फारसा लाभ झाला नव्हता. असे असतानाही या वेळी शासनाकडे काही हवामानतज्ज्ञांनी प्रयोगासाठी रेटा लावला होता. चार वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगातून १५ ते २० टक्के जास्तीचा पाऊस पडला होता, असा दावा मदत व पुनवर्सन विभागाने केला होता. या वर्षीदेखील कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे ३० ते ४० टक्के पाऊस जास्तीचा पडेल, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्य आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणी जास्त माहिती देणे टाळले.
पाणीपुरवठामंत्र्यांनी सांगितले
पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री याबाबत सांगू शकतील. कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रयोग होईल; पण कुठे, केव्हापासून सुरू होणार, हे माहिती नाही. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत प्रयोगासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.