जातीय द्वेषाची सोशल मीडियात पोस्ट टाकणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 08:20 PM2020-03-09T20:20:49+5:302020-03-09T20:21:14+5:30

शहरातील सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या मेसेजकडे आता पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

Arrested for posting racial hatred on social media | जातीय द्वेषाची सोशल मीडियात पोस्ट टाकणाऱ्यास अटक

जातीय द्वेषाची सोशल मीडियात पोस्ट टाकणाऱ्यास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देकाही नागरिकांनी स्क्रीन शॉट घेऊन मेसेज जपून ठेवला.

औरंगाबाद : दोन समाजांत तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर हत्यार म्हणून करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टकडे आता औरंगाबाद शहर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील एका व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्या शिवनारायण मोतीलाल तोतला (रा. केळीबाजार, ५०) या आरोपीवर सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

मागील काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर बराच वाढला आहे. सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकली तर क्षणार्धात ती लाखो नागरिकांपर्यंत पोहोचते. याचा गैरफायदा घेण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. केळीबाजार येथील रहिवासी तथा चेलीपुरा, मोंढा येथील होलसेल व्यापारी शिवनारायण मोतीलाल तोतला यांनी शनिवारी मध्यरात्री एका व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे ग्रुपच्या सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली. तोतला यांना झालेली चूक त्वरित कळाली. त्यांनी मॅसेज त्वरित डिलीटही केला. काही नागरिकांनी स्क्रीन शॉट घेऊन मेसेज जपून ठेवला. मध्यरात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेक नागरिक आले. मध्यरात्री त्वरित भादंवि २९५ (अ) नुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी पहाटे ४ वाजता आरोपी तोतला याला उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, देशमुख, संतोष सपकाळ, मोरे यांनी अटक केली. आज सकाळी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर लगेच त्याचा जामीनही मंजूर करण्यात आला. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक पाटे करीत आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

शहरातील सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या मेसेजकडे आता पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अशा विद्वेषाच्या पोस्ट टाकणारांचा शोध घेऊन त्वरीत अटक करण्यात येईल. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणारी पोस्ट टाकण्यात येऊ नये, असे आवाहन सिटीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी केले आहे. 

Web Title: Arrested for posting racial hatred on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.