मजुरीच्या पैशांवरून भावंड भिडले; चाकू, कैचीने वार करून लहान भावाचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:07 IST2025-06-12T16:05:51+5:302025-06-12T16:07:10+5:30

लहान भावाचा खून केल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी विनोद आव्हाड याला बुधवारी पहाटे खेडीफाटा येथील एका शेडमध्ये झोपलेला असताना ताब्यात घेतले.

Argument over wage money; Man kills younger brother with knife, scissors | मजुरीच्या पैशांवरून भावंड भिडले; चाकू, कैचीने वार करून लहान भावाचा केला खून

मजुरीच्या पैशांवरून भावंड भिडले; चाकू, कैचीने वार करून लहान भावाचा केला खून

चिंचोली लिंबाजी ( छत्रपती संभाजीनगर) : बांधकाम मजुरीच्या पैसे वाटपातून दारूच्या नशेत दोन भावांमध्ये झालेल्या वादानंतर मधल्याने लहान भावाचा चाकूने व कैचीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कन्नड तालुक्यातील दिगाव येथे घडली. सुनील भीमराव आव्हाड (वय ३६ वर्षे) असे मृताचे तर विनोद भीमराव आव्हाड असे आरोपीचे नाव आहे.

दिगाव येथील भीमराव आव्हाड यांना ४ मुले आहेत. त्यातील सर्वात मोठा प्रकाश, दुसऱ्या क्रमांकाचा विनोद आणि तिसऱ्या क्रमांकाचा सुनील भीमराव आव्हाड हे तीन भाऊ आई, वडिलांसह एकत्र राहात होते. तिघेही विवाहित असून, त्यांच्या बायका सोबत राहात नाहीत. ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. तीन-चार दिवसांपूर्वी आई, वडील दवाखान्याच्या कामासाठी मुंबई येथे राहात असलेल्या सर्वात लहान चार नंबरच्या मुलाकडे गेले होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे तिघे भाऊ खेडीफाटा येथे बांधकाम मिस्तरीच्या हाताखाली काम करून सायंकाळी घरी आले. तिघांनी चिकन आणून बिर्याणी तयार केली. मोठा भाऊ प्रकाश बाहेर गेल्यानंतर आरोपी विनोद व मयत सुनील या दोघा भावांनी सोबत दारू प्राशन केली. यानंतर नशेत या दोघांमध्ये मजुरीच्या पैसे वाटपातून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन नंबरचा भाऊ विनोदने बाजूलाच पडलेल्या चाकूने लहान भाऊ सुनील याच्या गळ्यावर, पाठीवर सपासप वार केले. यात सुनील गंभीर जखमी झाला.

ही बाब शेजाऱ्यांनी सरपंच पुंजाराम सुसूंद्रे व ग्रा. पं. सदस्य दिगंबर सुसूंद्रे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने जखमी सुनील याला सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पिशोरचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव नागवे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत मोठा भाऊ प्रकाश आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलिसांनी विनोद आव्हाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी दुपारी १ वाजता उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी ४ वाजता मयत सुनील याच्या पार्थिवावर दिगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे.

खुनानंतर झोपलेल्या आरोपीला अटक
लहान भावाचा खून केल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी विनोद आव्हाड याला बुधवारी पहाटे खेडीफाटा येथील एका शेडमध्ये झोपलेला असताना ताब्यात घेतले. यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. पोलिस आरोपीला गुरूवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Argument over wage money; Man kills younger brother with knife, scissors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.