नववर्षाचा संकल्प अर्ध्यावर सुटतोय? खचून जाऊ नका! मनोविकार तज्ज्ञांनी दिला 'हा' कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:13 IST2026-01-02T19:13:10+5:302026-01-02T19:13:51+5:30
नव्या वर्षातील संकल्पांचा काही दिवसांतच पडतो विसर; पूर्ण कसे कराल? मनोविकार तज्ज्ञ म्हणाले...

नववर्षाचा संकल्प अर्ध्यावर सुटतोय? खचून जाऊ नका! मनोविकार तज्ज्ञांनी दिला 'हा' कानमंत्र
छत्रपती संभाजीनगर : नववर्षाच्या सुरुवातीला अनेक जण आरोग्य, करिअर, व्यायाम, बचत किंवा सवयी बदलण्याचे संकल्प करतात. मात्र काही आठवड्यांतच उत्साह ओसरतो आणि संकल्प अर्ध्यावरच राहतात. एक-दोन दिवस संकल्प पाळता आला नाही की, अनेक जण स्वतःला अपयशी समजतात. याच वृत्तीमुळे संकल्प मोडतो. परंतु संकल्प पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे ठरते, असे तज्ज्ञ म्हणाले.
संकल्प पूर्ण होण्यासाठी काय कराल?
- संकल्प पूर्ण होण्यासाठी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी. संकल्पाच्या दिशेने कृती करण्यासाठी सातत्याने पावले उचलावीत.
- ध्येय गाठण्यासाठी कृती योजना बनवून ध्येयाला लहान-लहान लक्ष्यांमध्ये विभाजित करावे. ध्येयाच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित न करता लहान लक्ष्य साध्य करण्यावर भर द्यावा.
- संकल्पासाठी उचललेली पावले आपल्याला त्याच ध्येयाकडे घेऊन जात आहेत ना, हे वेळोवेळी तपासायला पाहिजे.
- मोठ्या संकल्पाचे लहान टप्पे करा. आजपासून रोज १ तास व्यायामाऐवजी १० ते १५ मिनिटांपासून सुरुवात करा.
- आठवड्याचे लहान लक्ष्य ठरवा, महिन्याचे नाही.
- एकावेळी एकच संकल्प करा. लिखित स्वरूपात संकल्प ठेवा. प्रगतीची नोंद ठेवावी.
- कुटुंबीय किंवा मित्रांना संकल्प सांगा. त्यातून संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी वाढते.
वास्तववादी नियोजन करा
संकल्प पूर्ण होण्यासाठी फक्त इच्छाशक्ती पुरेशी नसते. वास्तववादी नियोजन, मेंदूची कार्यपद्धती समजून घेणे, मानसिक स्वास्थ्य आणि सातत्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. छोटे पण नियमित पावलेच दीर्घकाळ टिकणारा बदल घडवतात.
- डाॅ. मेराज कादरी, मनोविकार तज्ज्ञ
प्रयत्न करत राहा
संकल्पात खंड पडल्यास काही जण नाउमेद होऊन पुढे संकल्प सोडून देतात. संकल्प अगदी शंभर टक्के अमलात यायलाच पाहिजे, नाहीतर तो करणेच व्यर्थ आहे, अशीही काही जणांची धारणा असते. संकल्प काही प्रमाणात जरी यशस्वी झाला तर ही जमेची बाजू किंवा यश आहे, हे लक्षात ठेवावे व संकल्प अधिक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहावे.
- डॉ. आनंद काळे, मनोविकार तज्ज्ञ
संकल्प लिहून ठेवा
संकल्प करताना वास्तववादी दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. लहान आणि साध्य उद्दिष्टे ठरवा, संकल्प लिहून ठेवा, आठवड्याला किंवा महिन्याला स्वतःचा आढावा घ्या, लहान यश साजरे करा, यामुळे प्रेरणा टिकते, सवयींमध्ये बदल करा. अपयश आले तरी हार मानू नका; पुन्हा सुरुवात करा. प्रगती दिसल्यावर हळूहळू नवीन संकल्प जोडा.
- डाॅ. अमोल देशमुख, मनोविकार तज्ज्ञ