‘कमान’ गायब, गोंधळ कायम! छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्गात खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:18 IST2025-05-21T19:17:48+5:302025-05-21T19:18:14+5:30

वऱ्हाडींच्या दोन ट्रॅव्हल्समुळे दोन्ही बाजूंनी तासभर वाहने अडकली, भुयारी मार्गातून ‘राँग साईड’ वाहने घुसली

'Arch' missing, chaos continues! Traffic jam in Shivajinagar subway in Chhatrapati Sambhajinagar | ‘कमान’ गायब, गोंधळ कायम! छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्गात खोळंबा

‘कमान’ गायब, गोंधळ कायम! छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्गात खोळंबा

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी एका बाजूने बसवण्यात आलेली एक लोखंडी कमानच गायब असल्याने रोजच वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे.

मंगळवारीदेखील लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॅव्हल्सने भर दुपारी १२ वाजता भुयारी मार्गात बस घुसवली. परिणामी, वाहतुकीत अडकलेले नागरिक घामाने ओलेचिंब होत कर्णकर्कश आवाजाने हैराण झाले. तरीही संबंधित शासकीय यंत्रणांना गांभीर्य नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाच्या बांधकामादरम्यान अभियंत्यांनी केलेला बेजबाबदारपणा उघडा पडला. यामुळे शहरासोबत शासकीय विभागांची नाचक्की झाली. लोकार्पणावेळी श्रेयासाठी उपस्थित नेत्यांनी भुयारी मार्गातील चुका उघड झाल्यानंतर मात्र पाठ फिरवली. पाण्याच्या निचऱ्यासोबतच या भुयारी मार्गाच्या लांबी, रुंदी व उंचीवरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहनांबाबत कुठलीच स्पष्टोक्ती नसल्याने नागरिकांना रोज येथे वाहतूक खोळंब्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

कमान एक; बसवणार कोण व कधी?
जड, अवजड वाहनांना प्रवेशबंदीसाठी भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी ३.४ मीटरची अभियंत्यांनी मोठ्या आकाराची लोखंडी कमान बसवली. मात्र, शिवाजीनगर चौकातील कमान अनेक दिवसांपूर्वी अपघातामुळे काढण्यात आली. त्यानंतर ती बसवण्याचे कष्ट संबंधित विभागाने घेतलेच नाहीत. या कमानीची उंची कमी करून तत्काळ बसवावी, असे पत्रही वाहतूक पोलिसांनी काढले. मात्र नियमांवर बोट ठेवत सा. बां. व रेल्वे विभागाचे नाव सांगत हात वर केले.

रोजच डोक्याला ताप? सांगावे कोणाला?
मंगळवारी दुपारी १२ वाजता लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स शिवाजीनगरकडून देवळाईच्या दिशेने जात भुयारी मार्गात गेल्या. तोपर्यंत चालकाला देवळाई चौकातील प्रवेशबंदीची लोखंडी कमान दिसली नाही. शिवाय भुयारी मार्गाच्या उंचीचा अंदाजही आला नाही. त्यामुळे तासभर वाहतूक खोळंबली. स्थानिक व्यापारी, रहिवाशांनी मात्र रोजच हा डोक्याला ताप झालाय, सांगावे कोणाला, असा संतप्त प्रश्न केला.

वाहतूक पाेलिसांच्या मते
-भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रवेशबंदीचे दोन मोठे फलक अपेक्षित.
-गती, कुठल्या वाहनांना प्रवेश, हे स्पष्ट सांगणारे फलक लावावेत.
-देवळाई, शिवाजीनगर चौकातील रिक्षाचालकांसाठी जागा निश्चित करावी.

Web Title: 'Arch' missing, chaos continues! Traffic jam in Shivajinagar subway in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.