समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; काकांच्या अंत्यविधीवरून परणाऱ्या ४ भावंडांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:58 IST2023-05-24T13:57:00+5:302023-05-24T13:58:31+5:30
समृद्धी महामार्गावर वरझडी शिवारात भीषण अपघातात एका घरातील चार जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; काकांच्या अंत्यविधीवरून परणाऱ्या ४ भावंडांचा मृत्यू
- श्रीकांत पोफळे
करमाड ( छत्रपती संभाजीनगर) :समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील वरझडी शिवारात आज पहाटे कार दुभाजकावर आदळून भीषण अपघातात झाला. यात कारमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. भरधाव वेगात चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील वरझडी शिवारात आज पहाटे कारचा (GJ 05 RN 8450) भीषण अपघात झाला. यात श्रीनिवास गौड 38, कृष्णा गौड 39, संजीव गौड 46, सुरेश गौड 39 या एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाला. तर भार्गव गौड 18 हा तरुण जखमी झाला आहे. हे सर्व जण सुरत ( गुजरात ) येथील रहिवाशी आहेत. रात्री गाडी चालवत असताना भरधाव वेगामुळे चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. करमाड पोलीस ठाण्याचे पोनी मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना विजय जारवल, सुभाष भाकरे हे पुढील तपास करीत आहे.
काकांच्या अंत्यविधीवरून परतत होते
दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून पाचही भावंडे सुरतकडे परतत होते. दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत चौघेही एकाच घरातील असून चुलत भावंडे आहेत.