ऑरिक सिटीमध्ये आणखी ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार: उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:16 IST2025-09-30T17:16:36+5:302025-09-30T17:16:44+5:30
एमआयडीसीसाठी आणखी पाच हजार एकर जमिनीचे वर्षभरात संपादन

ऑरिक सिटीमध्ये आणखी ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार: उदय सामंत
छत्रपती संभाजीनगर : येथे येऊ घातलेल्या नवीन कंपन्यांचा विचार करता औद्योगिक क्षेत्र कमी पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वर्षभरात आणखी ५ हजार एकर जमीन संपादित करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. २९) येथे ऑरिकच्या सहाव्या वर्धापनदिन समारंभात केली.
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअर (डीएमआयसी)अंतर्गत ऑरिक सिटीच्या सहाव्या वर्धापनदिन समारंभाचे आयोजन सोमवारी शेंद्र्यातील ऑरिक हॉलमध्ये केले होते. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. भागवत कराड, आ. अनुराधा चव्हाण, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. डी. मलिकनेर, दत्ता भडकवार, मानद संचालक भास्कर मुंडे, जीएसटीचे आयुक्त अभिजीत राऊत, अरुण दुबे, शैलेश धाबेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्तविकात एम. डी. मलिकनेर म्हणाले की, सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिकचे लोकार्पण झाले. ऑरिकच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले. शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात विविध कंपन्यांनी सुमारे ८५ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शिवाय, टोयोटा येथे स्कील सेंटर विकसित करीत आहे.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, ऑरिकमध्ये प्लग ॲण्ड प्ले सुविधांमुळे देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. येथे आणखी सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ घातली आहे. या उद्योगांना जागा कमी पडू नये, याकरिता वर्षभरात आणखी ५ हजार एकर जमिनीचे संपादन करणार आहोत. मंत्री सावे म्हणाले की, ऑरिकमध्ये मोठी गुंतवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर शेंद्रा, बिडकीन येथे आणखी जमिनीचे संपादन करावे, अशी सूचना केली आहे.
स्वागताला फाटा
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांच्या सूचनेनुसार समारंभात हार, तुरे, स्वागत समारंभाला फाटा देण्यात आला.