-------
पाणीपुरवठा योजनेची वर्कऑर्डर दिली
औरंगाबाद : शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. एमजीपीचे सदस्य सचिव निंबाळकर यांच्याशी चर्चा केली आहे. संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर देण्यात आली आहे, असा दावा पालकमंत्री देसाई यांनी केला.
----------
आवास योजनेच्या प्रस्तावाचे काम सुरू
औरंगाबाद : मनपाचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तो प्रस्ताव माझ्याकडे आला आहे. तीस गावमधील तो प्रस्ताव असून, त्यावर कामकाज सुरू आहे. प्रस्ताव तयार करणे प्रशासकीय बाब आहे. त्यात राजकारणाचा मुद्दा येत नाही. त्यामुळे कोण काय टीका करते याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
--------
विभागीय क्रीडा संकुल नऊ महिन्यांनंतर खुले
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय क्रीडा संकुल नऊ महिने बंद होते. काही अटी व शर्तींच्या अधीन राहून विविध खेळांच्या सरावासाठी विभागीय क्रीडा संकुल खुले केल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी सांगितले. पोलीस, सैन्य भरतीतील प्रशिक्षणार्थी खेळाडूंसाठी विशेष साधन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. इतर क्रीडा प्रकारातील खेळाडूंसाठीही मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. विभागीय क्रीडा संकुलात चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून विभागीय क्रीडा संकुल खुले करण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, फुलचंद सलामपुरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. मकरंद जोशी, डॉ. उदय डोंगरे, अंजली सिरसीकर, रणजित पवार, सागर मगरे, स्वप्निल तांगडे, राष्ट्रीय विक्रमवीर खेळाडू साक्षी चव्हाण, आदींसह प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी खेळाडूंची उपस्थिती होती.
----------
प्रस्ताव स्वीकारण्याबाबत आवाहन
औरंगाबाद : समाज कल्याण विभागाकडील सर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव या आर्थिक वर्षात ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारून योजनानिहाय परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आहवान जि. प. समाज कल्याण सभापती व समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.