गर्लफ्रेंडवरून दोघे भिडले, त्यांच्या वादात पडल्याने दुसऱ्याच तरुणाच्या पोटात चाकूचा वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:03 IST2025-01-17T17:03:00+5:302025-01-17T17:03:49+5:30
तीन तासांत दोन मुख्य हल्लेखोर अटकेत, तरुणी पसार

गर्लफ्रेंडवरून दोघे भिडले, त्यांच्या वादात पडल्याने दुसऱ्याच तरुणाच्या पोटात चाकूचा वार
छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणीसोबत फिरताना पाहिल्याच्या कारणावरून एका तरुणाने अन्य टवाळखोरांच्या मदतीने दोन तरुणांवर हल्ला चढवला. यात ऋत्विक जितेंद्र कुलकर्णी (वय २३, रा. सिल्कमिल कॉलनी) याच्या चेहऱ्यावर दोन, तर पोटात तब्बल १२ इंच खोल वार करून हत्येचा प्रयत्न करण्यात आला.
उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय खोत नामक तरुण बुधवारी एका तरुणीसोबत दशमेशनगरमध्ये फिरत होता. मुख्य हल्लेखोर प्रणव हंडोरेला मात्र ही बाब सहन झाली नाही. त्याने गुरुवारी अमेयला भेटण्यासाठी दशमेशनगरमध्ये बोलावले. सायंकाळी ५ वाजता प्रणव हा जवळपास ५ ते ६ टवाळखोरांना सोबत घेऊन गेला होता, तर अमेयचा मित्र ऋतिक त्याच्यासोबत यावेळी उपस्थित होता. वाद असलेली तरुणी देखील या ठिकाणी उपस्थित होती. अमेय व प्रणवमध्ये वाद वाढला व अमेयला सर्वांनी मिळून बेदम मारहाण सुरू केली.
मधे पडला आणि चाकू पोटात
मित्राला मारहाणीतून वाचवण्यासाठी ऋतिक भांडणात पडला. मात्र, प्रणवसोबत आलेला मनू काथार याने चाकू काढून थेट ऋतिकचे डोळे, गालावर वार केला. शेवटचा वार ऋतिकच्या पोटात १२ इंच खोलवर झाला. तो क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती कळताच उस्मानपु्ऱ्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मनू व प्रणवने धुम ठोकली होती. येरमे यांनी पाठलाग करून दोघांच्या पुंडलिकनगरमध्ये मुसक्या आवळल्या. रात्री उशिरापर्यंत त्या दोघांसह तरुणी व अन्य मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती येरमे यांनी दिली.