कामावरून काढण्याची तंबी दिल्याचा राग, रिसेप्शनिस्ट तरुणीचा गुंडांसह डॉक्टरवर हल्ला, तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:41 IST2026-01-22T19:41:15+5:302026-01-22T19:41:56+5:30

लाठ्या-काठ्यांनी रुग्णालयाची तोडफोड, हल्ल्यात डॉक्टरचा कान निकामी

Angry over being threatened with dismissal, receptionist girl attacks doctor with village goons | कामावरून काढण्याची तंबी दिल्याचा राग, रिसेप्शनिस्ट तरुणीचा गुंडांसह डॉक्टरवर हल्ला, तोडफोड

कामावरून काढण्याची तंबी दिल्याचा राग, रिसेप्शनिस्ट तरुणीचा गुंडांसह डॉक्टरवर हल्ला, तोडफोड

छत्रपती संभाजीनगर : कामातील निष्काळजीपणामुळे कामावरून काढून टाकण्याची तंबी देत रुग्णालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून कर्मचारी तरुणीने १५ ते २० गावगुंडांसह डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला. लाठ्या-काठ्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली. यात डॉ. अंकुश आसाराम जाधव (३५) हे गंभीर जखमी झाले. त्यांचा एक कान निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मंगळवारी डॉ. जाधव यांच्या तक्रारीवरून शर्ली भालेराव, तिचा मित्र प्रवीण बिश्वाकर्मासह १५ ते २० गावगुंडांवर सातारा ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रकाशपर्व आरोग्य शिक्षण सेवा फाउंडेशनच्या वतीने नक्षत्रवाडीत मातोश्री मल्टिस्पेशालिटी रुग्णालय चालवले जाते. डॉ. जाधव रुग्णालयाचे संचालक असून त्यांच्याकडे डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी मिळून एकूण २२ जण काम करतात. त्यापैकी शर्ली रिसेप्शनिस्ट होती. काही दिवसांपासून तिने कामात निष्काळजीपणा सुरू केला. तिने रुग्णालयाचा गणवेश परिधान करण्यास नकार दिला. व्यवस्थापक आकाश भागवत यांनी तिला याबाबत समज देऊनही तिच्या वागण्यात बदल झाला नाही. जाधव यांनीही तिला वागण्यात सुधारणा न झाल्यास कामावरून कमी करण्याची तंबी दिली. १६ जानेवारी रोजी मध्यरात्री जाधव यांना शर्लीचा मित्र प्रवीण बिश्वाकर्मा याने काॅल करून 'तुम्ही माझ्या मैत्रिणीला कामावरून का काढत आहात? उद्या रुग्णालय फोडून तुमचे हात, पाय तोडतो', असे धमकावले. या प्रकारामुळे त्यांनी शर्लीला रुग्णालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर केले.

१७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शर्ली, प्रवीण, एक महिला व १५ ते २० गावगुंड रुग्णालयात गेले. जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करून रुग्णालयाची तोडफोड केली. बिश्वाकर्माने त्यांच्या कानावर कड्याने वार केले. रुग्णालयाबाहेर नेत मारहाण केली. जाधव रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळताच शर्लीसोबतच्या महिलेने त्यांच्या मानेवर कुंडी टाकली. पोलिसांनी धाव घेतल्याने हल्लेखोर पसार झाले.

डावा कान निकामी, गंभीर इजा
हल्ल्यानंतर जाधव यांना डाव्या कानाने ऐकू येणे बंद झाले. शिवाय, संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या जबाबावरून २० जानेवारी रोजी शर्ली, बिश्वाकर्मासह टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले. त्यांचा शोध घेऊन लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी सांगितले.

Web Title : नौकरी से निकालने की धमकी से नाराज़ रिसेप्शनिस्ट ने गुंडों से डॉक्टर पर हमला किया।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में नौकरी से निकाली गई रिसेप्शनिस्ट ने गुंडों के साथ मिलकर एक डॉक्टर पर हमला किया और अस्पताल में तोड़फोड़ की। रिसेप्शनिस्ट को खराब प्रदर्शन के बारे में चेतावनी दी गई थी, जिसके बाद डॉक्टर गंभीर रूप से घायल हो गए।

Web Title : Receptionist, angry at firing threat, attacks doctor with goons, vandalizes.

Web Summary : Fired receptionist, fueled by rage, attacked a doctor with goons, vandalizing his hospital in Chhatrapati Sambhajinagar. The doctor suffered severe injuries, including hearing loss, after the receptionist was warned about poor performance.