बहिणीला भेटून घरी परताना इंजिनिअर तरुणाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:00 IST2023-07-24T11:58:28+5:302023-07-24T12:00:14+5:30
जालना रोडवर दोन दुचाकीच्या धडकेत इंजिनिअर तरूणाचा जागीच मृत्यू झाला

बहिणीला भेटून घरी परताना इंजिनिअर तरुणाचा अपघातात मृत्यू
करमाड : जालना रोडवरील एका हॉटेलजवळ रविवारी रात्री ८ वाजता दोन दुचाकीच्या धडकेत अभियंता तरुण जागीच ठार झाला. आकाश बापूराव शिंदे ( 23, रा दुधनवाडी ता. बदनापूर जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील बहिणीला भेटून आकाश शिंदे रविवारी रात्री गावाकडे परतत होता. जालना रोडवरील एका हॉटेलजवळ त्याच्या दुचाकीचा अन्य दुचाकीसोबत अपघात झाला. रस्त्यावर पडल्याने आकाशच्या डोक्याला जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून आकाशला मृत घोषित केले.
दोन महिन्यानंतर होणार होते लग्न
आकाशला दोन मोठ्या बहिणी होत्या. तो पुणे येथे इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. मात्र, त्याला दोन महिन्यांपूर्वी हृदयरोगाचा त्रास झाला. त्यामुळे आरामासाठी सध्या मूळगाव दुधनवाडी ( बदनापूर) येथे तो आला होता. दरम्यान, आकाशचे लग्न ठरले होते. दोन महिन्यानंतर लग्नाची तारीख काढण्यात आली होती. मात्र अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.