एन्काउंटरमध्ये अमोलनेच पहिली गोळी झाडली; त्यावेळी गाडीत असलेल्या खुशीचा जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:06 IST2025-06-07T13:05:53+5:302025-06-07T13:06:26+5:30

अमोलच्या मैत्रिणीचा न्यायालयात जबाब : तिच्याकडूनच उलगडणार सोन्याचे गूढ ?

Amol khotkar fired the first shot in the encounter; Khushi, who was in the car at the time, testified in court | एन्काउंटरमध्ये अमोलनेच पहिली गोळी झाडली; त्यावेळी गाडीत असलेल्या खुशीचा जबाब

एन्काउंटरमध्ये अमोलनेच पहिली गोळी झाडली; त्यावेळी गाडीत असलेल्या खुशीचा जबाब

छत्रपती संभाजीनगर : एन्काउंटरनंतर कलम १६४ अंतर्गत एन्काउंटरमधील महत्त्वाच्या साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवले गेले. त्या जबाबात बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याची मैत्रीण हाफिजा ऊर्फ खुशी अख्तर अली शेख (२७, मूळ रा. पश्चिम बंगाल) हिने अमोलनेच पहिली गोळी झाडल्याचा जबाब दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तिचा हा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. खुशीसह अमोलच्या जवळच्या एका व्यक्तीच्या चौकशीवर आता लुटलेल्या सोन्याच्या तपासाची मदार अवलंबून आहे. त्यासाठी पोलिसांनी खुशीचा ताबा मिळण्यासाठी सीआयडीला त्यासाठी पत्र पाठवल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कंपनीतील सततचा अपमान व उद्योजक लड्डा यांच्याविषयी ईर्षेतून त्यांचाच बालमित्र बालासाहेब इंगोले (४६, रा. वाळूज महानगर) याने दरोड्याचा कट रचला होता. यासाठी त्याने अमोल, योगेश हाजबेव्यतिरिक्त देवीदास शिंदे, महेश गोराडे, गणेश गोराडे, आजिनाथ जाधव यांच्यासोबत समांतर दुसरा कट रचला होता. मात्र, अमोल व हाजबेने लड्डा यांची इत्यंभूत माहिती घेत त्यांनाच बाजूला सारत दरोडा टाकून लुटमार केली. गुरुवारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या पथकाने इंगोले, गोराडे बंधू, शिंदे व जाधव यांना न्यायालयात हजर केले. त्यांची चौकशी पूर्ण झाल्याचे पोलिसांनी सांगितल्याने न्यायालयाने त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली.

सराफाला पोलिस कोठडी
गुन्हे शाखेने गुरुवारी अंबाजोगाईचा सुरेश गंगणेचे सोने विकण्यास मदत करणाऱ्या शेख अबुजर ऊर्फ शाहिद, शेख सोहेल शेख मुस्तफा (दोघे रा. अंबाजोगाई), शेख शाहरुख शेख रफिक (नांदेड) व सराफा व्यावसायिक आशिष जयकुमार बाकलीवाल यांना अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना ९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गंगणेने दरोड्यातील हिरे, चांदीची भांडी तेलंगणा, आंध्रात विकल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

१६ मेला अमोल दोन तास घरात
खुशीचा ताबा सध्या सीआयडीकडे असून, तिला महिला राजगृहात ठेवण्यात आले आहे. १५ मे रोजी दरोड्यानंतर १६ मे रोजी अमोल तिच्यासह पडेगावच्या घरी गेला होता. जवळपास २ तास घरात थांबून, दोघेही २५ मेपर्यंत विविध राज्यांत फिरून शहरात परतले होते. यादरम्यान खुशीकडे सोन्याविषयी माहिती असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिची चौकशी महत्त्वाची असल्याने तिचा ताबा देण्यासाठी पोलिसांनी सीआयडीला पत्र लिहिले आहे. तिच्यासह अमोलच्या आणखी एका जवळच्या व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे.

Web Title: Amol khotkar fired the first shot in the encounter; Khushi, who was in the car at the time, testified in court