मराठवाड्यात अजित पवारांची मुसंडी; शिंदेसेनेपेक्षा पटकावल्या दुप्पट जागा
By नजीर शेख | Updated: December 23, 2025 11:58 IST2025-12-23T11:58:09+5:302025-12-23T11:58:55+5:30
भाजपचे सर्वाधिक नगरसेवक, शिंदेसेना तिसऱ्या क्रमांकावर, उद्धवसेना सहाव्या स्थानी

मराठवाड्यात अजित पवारांची मुसंडी; शिंदेसेनेपेक्षा पटकावल्या दुप्पट जागा
छत्रपती संभाजीनगर : नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत मराठवाड्यात ५२ पालिकांमध्ये १२४४ जागांपैकी तब्बल ३०१ जागा जिंकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. अर्थात ३५५ नगरसेवक निवडून आणत भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर शिंदेसेना असताना मराठवाड्यात मात्र या पक्षाला तिसऱ्या जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिंदेसेनेला १४७ जागा मिळाल्या आहेत. राज्यातील प्रमुख सहा पक्षांमध्ये उद्धवसेना मात्र सहाव्या क्रमांकावर आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत चुरशीच्या लढतीत भाजपने २८ टक्केपेक्षा अधिक जागा घेत बाजी मारली आहे. मराठवाड्यात २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १९ आमदार निवडून आले होते. त्याखालोखाल शिंदेसेनेने १३ जागा जिंकत दुसरे स्थान प्राप्त केले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाला ८ जागा जिंकत तिसरे स्थान मिळाले होते. मात्र, आता नगर परिषदांच्या निवडणुकीत अजित पवार यांनी जोरदार प्रचार करीत पक्षाला दुसरे स्थान प्राप्त करून दिले आहे. अजित पवार गटाचे शिंदेसेनेपेक्षा दुपटीने नगरसेवक निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने ५९ जागा जिंकत उद्धवसेनेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. मराठवाड्यात उद्धवसेनेचे तीन आमदार आणि तीन खासदार असताना या पक्षाला केवळ ५४ नगरसेवक निवडून आणता आले. एमआयएमचे आठ तर वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्रपणे केवळ १ नगरसेवक निवडून आला आहे. बीडमध्ये ‘वंचित’ आणि काँग्रेस आघाडीचे मात्र तीन नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय स्थानिक पातळ्यांवर झालेल्या विविध आघाड्यांनाही चांगले यश मिळाले आहे. अशा आघाड्यांचे मराठवाड्यात १२६ नगरसेवक निवडून आले आहेत.
काँग्रेसची दमदार कामगिरी
मराठवाड्यातील ४६ पैकी केवळ एकच आमदार काँग्रेसचा आहे. असे असताना आणि अनेक नेते पक्ष सोडून चालले असताना या पक्षाने उत्तम कामगिरी केली आहे. काँग्रेसचे १४७ नगरसेवक निवडून आले आहेत.
मराठवाडा एकूण जागा : १,२४४
भाजप : ३५५
राष्ट्रवादी अजित पवार गट : ३०१
शिंदेसेना : १५४
काँग्रेस : १४७
उद्धवसेना : ५४
शरद पवार गट : ५९
एमआयएम : ०८
जनता दल (युनायटेड) : २
वंचित बहुजन आघाडी : १
रासप : २
अपक्ष : २७
स्थानिक आघाड्या : १२६
वंचित बहुजन आघाडीने बीडमध्ये काँग्रेसच्या सहकार्याने ३ जागांवर विजय मिळविला आहे. (तिन्ही जागा काँग्रेस पक्षाच्या संख्येत समाविष्ट आहेत.)

मराठवाडा पक्षनिहाय आमदार :
भाजप : १९
शिंदेसेना : १३
राष्ट्रवादी (अप) : ०८
रासप : ०१
काँग्रेस : ०१
उद्धवसेना : ०३
राष्ट्रवादी (शप) : ०१
एकूण : ४६