‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:35 IST2025-11-28T19:35:00+5:302025-11-28T19:35:22+5:30
टॉप टू बॉटम जनतेने शिवसेनेसोबत राहिल्यासच कन्नड शहराचा सर्वांगीण विकास होईल

‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील
कन्नड : प्रेमाच्या जाळ्यात टाकत राष्ट्रवादीने ‘आय लव यू’ म्हणत आमच्या मित्रपक्ष भाजपासोबत युती केली. धड शिवसेनेचे आणि मुंडके राष्ट्रवादीचे असल्यास विकास कसा होणार? त्यामुळे टॉप टू बॉटम जनतेने शिवसेनेसोबत राहिल्यासच कन्नड शहराचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी येथे आयोजित प्रचार सभेत केले.
कन्नड येथे शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची गुरुवारी रात्री ०८:०० वाजता शहरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होते. यावेळी ते बोलत होते. मंचावर खासदार संदीपान भुमरे, आमदार संजना जाधव, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता काकासाहेब कवडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सोनाली धाटबळे, शहरप्रमुख राम पवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी मंत्री पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी खासदार संदीपान भुमरे म्हणाले की, औट्रम घाटासाठी मी प्रयत्न केले आहेत. आदेशात माझे नाव आहे; पण फलक मात्र इतरांचे लावले जातात, अशी खोचक टीका त्यांनी भाजपाचे खासदार डॉ. भागवत कराड यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. प्रास्ताविक शिवाजी थेटे यांनी केले.